कोरोनाचे वाढते रुग्ण तिसऱ्या लाटेचे संकेत? ग्रामीण भागात नागरिक आता तरी सतर्क होतील का..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:08 AM2021-07-21T04:08:33+5:302021-07-21T04:08:33+5:30
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपल्या जवळच्या, शेजारच्या, वस्तीमधील, परिसरातील, अनेक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आपण पाहिले आहे. आपल्या अवतीभोवती ...
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपल्या जवळच्या, शेजारच्या, वस्तीमधील, परिसरातील, अनेक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आपण पाहिले आहे. आपल्या अवतीभोवती अनेक अनपेक्षित घटना घडल्या आहेत.अनेक तरुण करोनाचे बळी झाले आहेत.
दुसरी लाट संपतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा देखील आरोग्य खात्याने दिला होता. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे देखील आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दुसऱ्या लाटेतून बाहेर पडत असताना कोरोनाबाधितांचे कमी प्रमाण हे दिलासा देणारे होते.दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताच प्रत्येकजण बिनधास्त आणि निर्धास्त झालेला पाहायला मिळतोय.मध्यंतरीच्या काळात कोरोनाबाधित रुग्णांच्या कमी झालेल्या प्रमाण पाहून जणू कोरोना आता संपलाच अशाच आविर्भावात आता नागरिक वावरताना दिसत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत दुकाने, भाजीबाजार व इतर व्यवहार सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याकाळात दुकानांमध्ये,बाजारात गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे.अनेक ठिकाणी सॅनिटायझर देखील वापर होताना दिसत नाही.
अनेकांनी आता मास्क वापरायचे देखील बंद केले आहेत.लग्न, वराती, वाढदिवस याशिवाय जे अन्य कार्यक्रम आहेत त्या सर्व कार्यक्रमांमध्ये सर्रासपणे गर्दी पाहायला मिळत आहे. मंगल कार्यालयांमध्ये लग्नांना होणारी गर्दी देखील चिंताजनक आहे.
काही दिवसांपूर्वीच आपल्याकडे कोरोनाचा प्रादुर्भाव होता हे देखील नागरिक विसरून गेल्याचे दिसून येते.आता तरी आपण भानावर येऊ का , की पुन्हा परिस्थिती गंभीर झाल्यानंतरच आपण पुन्हा भानावर येऊ? हा प्रश्न सध्या तरी सतावणारा आहे.
"मध्यंतरीच्या काळात संपूर्ण जुन्नर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण कमी झाले होते. आता सध्या पुन्हा कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढू लागले आहे. मास्क,सॅनिटायझर यांसह नागरिकांनी लग्न,वराती, वाढदिवस यासारखे गर्दी होईल असे कार्यक्रम स्वयंस्फूर्तीने टाळावेत. लसीकरण झालेल्या नागरिकांना देखील कोरोनाची लागण होत आहे,म्हणून लसीकरण झालेल्या नागरिकांनी देखील काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाची लक्षणं दिसून आल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी.
डॉ.उमेश गोडे, तालुका आरोग्य अधिकारी,
जुन्नर
"मला काहीही होत नाही या भावनेमुळे कोरोनाचा अधिक प्रसार होतोय. तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण होणे हा प्रभावी उपाय आहे.
१८ ते ४५ वयोगटातील सर्वांना लसीकरण वेगाने व्हावे. एकाच वेळी संपूर्ण गावच्या गाव लसीकरण झाले तर त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. लग्नांवर शासनाने कडक निर्बंध आणण्याची गरज आहे. लग्नाला ५० लोकांची परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र ५०० पेक्षा अधिक नागरिक उपस्थित असतात.शासनाने लग्नांवर कडक निर्बंध आणले तर कोरोनाचा प्रसार थांबण्यास मोठी मदत होईल."
संतोष ठिकेकर,आदर्श सरपंच,
ठिकेकरवाडी, ता. जुन्नर