रायजिंग स्टार, सहारा क्रिकेटची आगेकूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:11 AM2021-03-16T04:11:57+5:302021-03-16T04:11:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सनी इलेव्हन क्रीडा प्रतिष्ठानतर्फे आयोजित स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात रायजिंग स्टार क्रिकेट अकादमीने पुणे क्रिकेट अकादमीचा ...
लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सनी इलेव्हन क्रीडा प्रतिष्ठानतर्फे आयोजित स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात रायजिंग स्टार क्रिकेट अकादमीने पुणे क्रिकेट अकादमीचा १८ धावांनी पराभव केला. या सामन्यात शुभम कदमने ४ षटकात २४ धावा देत ४ बळी मिळवले. सामन्याचा मानकरी शुभम ठरला. रायजिंगने २० षटकात पाच गडी गमावून १७० धावा केल्या. दानीन पटेल (५३), संकेत आदक (४०), विशाल शिंदे (२४) यांनी डावाला आकार दिला. पुणे क्रिकेट अकादमीचा डाव १९.३ षटकात १५२ धावांमध्ये आटोपला. सागर कांबळे, वैभव लवांडे, नीरज सेन यांची लढत अपुरी पडली.
दुसऱ्या सामन्यात सहारा क्रिकेट अकादमीने फ्रेंड्स क्रिकेट अकादमीचा आठ गड्यांनी पराभव केला. सामन्याचा मानकरी सागर होगाडेने बारा धावा देत ४ जणांना बाद केले. फ्रेंड्सने १८.५ षटकात ११५ धावा केल्या. प्रफुल्ल मानकर (६३) वगळता कोणी स्थिरावू शकले नाही. हे माफक आव्हान सहाराने फक्त ११.२ षटकात पूर्ण केले. ‘सहारा’कडून मानसिंग निगडे याने २५ चेंडूंमध्ये ६६ धावांची स्फोटक खेळी केली.
तत्पुर्वी सुनील तांबे (एसीपी, दहशतवाद विरोधी पथक) यांच्या हस्ते सोमवारी (दि. १५) स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अरविंद शिवले, वेंकटेश चिरमुला, नितीन कोतवाल, यशवंत भुजबळ, भरत मारवाडी, मकरंद भिडे, दिलीप काळोखे, शिरीष घोरपडे आदी यावेळी उपस्थित होते.