गॅसच्या किंमती वाढल्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:10 AM2021-03-21T04:10:51+5:302021-03-21T04:10:51+5:30
वाल्हे : दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या लाेकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे हाेणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त ...
वाल्हे : दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या लाेकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे हाेणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त हेतुने केंद्र सरकारने उज्वला याेजनेंतर्गंत गॅसचे वितरण केले. मात्र गत काही महिन्यात गॅसचे भाव गगणाला भिडल्याने तसेच सबसीडीही जवळपास बंदच झाल्याने, उज्वला याेजनेचे लाभार्थी व इतर गॅस धारक पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
उज्ज्वला याेजनेंतर्गत केंद्र शासनाने प्रत्येक कुटुंबाला गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. आता गॅस महागल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुलीवरच स्वयंपाक केला जात आहे. मात्र, चूल पेटविण्यासाठी राॅकेल मिळत नसल्याने विस्तव पेटविण्यासाठी महिलांच्या डाेळ्यांतून अश्रू बाहेर पडत आहेत. ग्रामीण भागातील ९० टक्के कुटुंबे सरपणाच्या माध्यमातून चुलीवरच स्वयंपाक करीत हाेते. चुलीवरच्या धुरामुळे महिलांना श्वसनाचे आजार हाेतात. हे आजार कमी करण्यासाठी केंद्र शासनाने ज्या कुटुंबाकडे गॅस उपलब्ध नाही, अशा कुटुंबांना सबसिडीवर गॅस उपलब्ध करून दिला. त्यामुळे आता ९० टक्के कुटुंबांकडे गॅस आहे. मात्र, स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्यालाच वाढत असून यामुळे सर्वांचेच आर्थिक 'बजेट"कोलमडत आहे. यात पगारदार, व्यावसायिकही चिंतेत असताना अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिली आहे. स्वयंपाकासाठी महिलांना वनवन भटकंती करीत सरपण जमा करावे लागते व धुराचा सामना करीत चूल पेटवावी लागते. महिलांचे हे हाल थांबून व वनांचेही रक्षण होण्यासह पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, या हेतुने केंद्र सरकारच्यावतीने पंतप्रधान उज्वला याेजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले. मात्र, दरात हाेत असलेलेल वाढ लाभार्थीसाठी डोकेदुखी ठरत आहे. सिलिंडरचे दर गरिबांच्या आवाक्याबाहेर. उज्वला याेजनेंतर्गंत गॅस कनेक्शन माेफत मिळाले. काही महिने सबसीडीही मिळाली. आता दरवाढ झाल्यानंतर सबसीडी मिळत नसल्याचे चित्र आहे.
--
चौकट
जुलै ते फेब्रवारी दरम्यान २२८ रुपयांनी वाढले दर
गेल्या वर्षी जानेवारी २०२० मध्ये ७१४.५० रुपयांवर असलेले सिलिंडरचे दर जुलै २०२० पर्यंत कमी होत जाऊन ५९९.५० रुपयांवर आले होते. जानेवारी २०२१ मध्ये हे दर ६९९.५० रुपयांवर पोहचला. त्यानंतर महिन्यात पुन्हा भाववाढ होऊन फेब्रुवारी २०२१ मध्ये सिलिंडरचे दर ७८९. ५०, तर मार्च २०२१ मध्येही गॅस सिलेंडरची भाववाढ होऊन सिलेंडर ८२७ रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे गृहीनी म्हणतात चुलीवरच स्वयंपाक बरा.
--
"उज्वला याेजनेंतर्गंत आम्हाला दोन वर्षांपूर्वी गॅस कनेक्शन माेफत मिळाले. उज्वला याेजनेंतर्गंत गॅस मिळाल्याने आनंद झाला होता. मात्र, महागडा गॅस वापरणे परवडत नाही. आम्ही दिवसभर उन्हातान्हात राबल्यावर १५० रूपये मिळतात त्यात सिलेंडरसाठी ८०० रूपये खर्च करायचे तर आम्ही मग खायचं काय ? त्यामुळे आपली बिन खर्चिक चुल बरी.
-सिंदूबाई रोकडे, गृहिणी वाल्हे.
--
कोरोना आल्यापासून, सगळ्याच वस्तू महाग झाल्यात. कोरोना यायच्या आधी तेलाचा पुडा ७५ रूपयाला मिळायचा, आता मिळतोय, १४४ रूपायाला. गॅस सिलिंडर मिळत होता, ५०० रुपयाला, सरकारने आधी सिलेंडर कनेक्शन फुकट वाटले आणि सिलेंडर खूप महाग केला त्यामुळे घरातील खर्च भागवितांना नाकीनऊ येत आहे. त्यात आता गॅस महाग झाल्यामुळे आम्ही आता सिलेंडर भरून आणला नाही. आता चुलीवर स्वयंपाक करतोय.
- वैशाली दुर्गाडे, गहिणी कामठवाडी.
--
चौकट -
९७० गॅस धारकांकडून सिलेंडर रिफिलींग नाही
केंद्र सरकारच्या 'उज्वला याेजनेंतर्गंत' मागील दोन-तीन वर्षामध्ये वाल्हे (ता.पुरंदर) येथील यशोधन गॅस एजन्सीच्या माध्यमातून आत्तापर्यंत, २५३९ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन माेफत देण्यात आले आहेत. उज्ज्वला योजनेअंतर्गत २५३९ गॅस कनेक्शन लाभार्थी असले तरी, यामधील ९७० उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेले लाभार्थी सिलेंडर महागाई व इतर काही कारणाणे गॅस सिलेंडर भरून नेत नाहीत. दिवसेंदिवस गॅस सिलेंडरची महागाई वाढत चालल्याने गॅस विक्रीवरही यांचा परिणाम मागील काही महिन्यांपासून होत असल्याची माहिती यशोधन गॅस एजन्सीच्या संचालिका आश्विनी वाघोले यांनी दिली.
--
फोटो क्रमांक : २० वाल्हे सिलेंडर
. फोटोओळ - वाल्हे (ता.पुरंदर) ग्रामीण भागात रानात काबाड क महिला स्वयंपाकाचा गॅस महाग झाल्याने, चुलीकडे वळल्याचे चित्र दिसत आहे.