बायोमेडिकल वेस्टचा धोका

By Admin | Published: July 27, 2016 04:43 AM2016-07-27T04:43:42+5:302016-07-27T04:43:42+5:30

शहरात हजारो छोटे दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब असतानाही ‘बायोमेडिकल वेस्ट’ची विल्हेवाट लावण्यासाठी नोंदणीच झालेली नाही. तेथे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लागते कशी, याची कोणतीही

The risk of biomedical waste | बायोमेडिकल वेस्टचा धोका

बायोमेडिकल वेस्टचा धोका

googlenewsNext

- सायली जोशी-पटवर्धन, पुणे

शहरात हजारो छोटे दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब असतानाही ‘बायोमेडिकल वेस्ट’ची विल्हेवाट लावण्यासाठी नोंदणीच झालेली नाही. तेथे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लागते कशी, याची कोणतीही माहिती महापालिकेकडे नाही. त्यामुळे कचरावेचकांपासून ते नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून महापालिकेतर्फे बायोमेडिकल वेस्ट गोळा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे त्याचे प्रमाणही वाढले आहे. परंतु,लहान दवाखान्यांची नोंद अतिशय कमी प्रमाणात असल्याचे चित्र आहे. शहरात हजारोंच्या संख्येत असणाऱ्या लहान-मोठ्या दवाखान्यांमध्ये विविध कारणांसाठी रुग्ण मोठ्या प्रमाणात जातात. मात्र, पालिकेकडे अतिशय कमी दवाखान्यांची नोंद असल्याचे पालिकेकडून मिळालेल्या माहितीवरून समोर आले आहे.
पुणे महापालिकेकडून शहरातील सर्व रुग्णालये, पॅथालॉजिकल लॅब, लहान-मोठे दवाखाने व ब्लड बँक यांचा बायोमेडिकल वेस्ट गोळा करण्याची स्वतंत्र यंत्रणा आहे. रुग्णालयांची पालिकेकडे नोंदणी करण्यासाठी आल्यास बायोमेडिकल वेस्टसाठी नोंदणी करणे बंधनकारक असते. मात्र, अनेक लहान दवाखाने पालिकेकडे बायोमेडिकल वेस्टसाठी नोंदच करत नाहीत. त्यांच्यावर पालिकेकडून कोणतीही कारवाईही होत नाही. तेव्हा अशाप्राकारे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे नेमके काय होते? हा कचरा नेमका जातो कुठे, हा प्रश्न आहे. पालिका प्रशासन याबाबत इतके थंड का? यामागचे नेमके कारण समजू शकत नाही.
बायोमेडिकल वेस्ट गोळा करण्यासाठीचे कंत्राट पालिका प्रशासनाकडून पॉस्को नावाच्या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीच्या शहरातील ७ मार्गावर ७ गाड्या आहेत. त्यांच्याद्वारे
मार्गावरील रुग्णालये व पॅथालॉजी लॅब, ब्लड बँक यांच्याकडील वेस्ट गोळा केले जाते. त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे काम ही कंपनी करते. हा कचरा गोळा करण्यासाठी संबंधित रुग्णालय किंवा पॅथालॉजी लॅबकडून पालिका ठराविक रक्कम घेते.
याबाबत स्वच्छ संस्थेचे विष्णू श्रीमंगले म्हणाले, ‘‘बायोमेडिकल वेस्ट नेहमीच्या कचऱ्यामध्ये टाकल्यास कचरावेचकांना त्याचा त्रास होतो. हल्ली विविध कारणांनी घरच्याघरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशावेळी वैयक्तिक रितीने बायोमेडिकल वेस्टसाठी नोंद केली जात नाही. हा कचरा नेहमीच्या कचऱ्यात टाकला जातो. यामध्ये आजारी माणसांचे डायपर, इंजेक्शनच्या सुया, सलाईनच्या बाटल्या यांचा समावेश असतो. त्यामुळे आजार पसरण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत. ’’
शहरातील एकूण ४१५९ संस्थांची नोंदणी पालिकेकडे असून दिवसाला ४०० संस्थांतील कचरा कंपनीकडून जमा केला जातो, असे पॉस्को कंपनीचे संचालक सुनील दंडवते यांनी सांगितले. यामध्ये लाल, पिवळे व पांढरे अशा तीन विभागांत कचरा गोळा केला जातो. या सर्व कचऱ्यावर विशिष्ट प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

बायोमेडिकल वेस्ट गोळा करणाऱ्या कंपनीकडून एक नवीन मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले असून, हा कचरा गोळा करण्यासाठी दुचाकींचा वापर करण्यात येणार आहे. डॉक्टरांनी आपल्याकडील कचरा नेण्यासाठी संबंधित मोबाईल क्रमांकावर मिसकॉल दिल्यास कंपनीचा प्रतिनिधी कचरा जमा करण्यासाठी दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जाणार आहे.

प्रशासनाचेही दुर्लक्ष : नोंदणी नाही
बायोमेडिकल वेस्टबाबत केंद्र सरकारचा कायदा असून, त्यात नुकतीच २८ मार्च २०१६ रोजी सुधारणा करण्यात आली आहे. सुधारित कायद्यानुसार ब्लड डोनेशन शिबिरे, लसीकरण शिबिरे, शाळा-महाविद्यालये, आयुर्वेदीक व युनानी दवाखाने यांचीही नोंदणी असणे आवश्यक आहे. मात्र, या नोंदणीबाबत प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. यामध्ये कचरा देणाऱ्या प्रत्येक संस्थेने आपली वेबसाईट तयार करून दर महिन्याला ही वेबसाईट अपडेट करावी, असे सांगण्यात आले आहे.

कत्तलखाने, सलून यांचीही बायोमेडिकल वेस्टसाठी नोंद होणे बंधनकारक आहे. मात्र, आपल्याकडे अशाप्रकारची कोणतीही नोंद होताना दिसत नाही. या गोष्टीचे गांभीर्य नसल्याने हा कचरा नेमका जातो कुठे, हा प्रश्न आहे.
- डॉ. अविनाश भोंडवे, इंडियन मेडकल असोसिएशन, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य

बायोमेडिकल वेस्ट आल्यास त्यासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा पालिकेकडे नाही. अनेकदा घरातून बायोमेडिकल वेस्ट आल्यास त्याबाबत प्रशासनाचे कर्मचारी काहीही करु शकत नाहीत. या कचऱ्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना हानी झाल्याच्या अनेक घटना याआधीही घडल्या आहेत.
- सुरेश जगताप, घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख

Web Title: The risk of biomedical waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.