पुन्हा चक्रीवादळाचा धोका, लक्षद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र, महाराष्ट्रात पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 09:34 PM2019-10-30T21:34:26+5:302019-10-30T21:39:12+5:30
कयार महाचक्रीवादळानंतर आता अरबी समुद्रात मालदीव जवळ एक कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी तयार झाले असून, येत्या १२ तासात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे.
पुणे : कयार महाचक्रीवादळानंतर आता अरबी समुद्रात मालदीव जवळ एक कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी तयार झाले असून, येत्या १२ तासात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. त्यामुळे लक्षद्वीप बेटे, केरळ, तामिळनाडु, कर्नाटक किनारपट्टी परिसरात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे़ कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
अरबी समुद्रावर कयार अतितीव्र चक्रीवादळ आता भारतापासून दूर गेले आहे. त्याचवेळी अरबी समुद्रात मालदीव परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. बुधवारी दुपारी ते केरळमधील तिरुअनंतरपुरम पासून २७० किमी दूर होते. गेल्या ६ तासात ते ताशी १३ किमी वेगाने पुढे सरकत आहे.सुदैवाने हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकत आहे. येत्या १२ तासात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे.
यामुळे लक्ष्यद्वीप बेटांवर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़ तसेच पुढील ४८ तासात केरळातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे़ ३१ आॅक्टोबरला कर्नाटक किनारपट्टीवरील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या २४ तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ शिरुर घोडनदी १५ मिमी तसेच सांगलीला पाऊस झाला़ बुधवारी दिवसभरात नाशिक ४, परभणी ५, औरंगाबाद ०.४ मिमी पावसाची नोंद झाली होती़ पुण्यात सायंकाळी काही ठिकाणी पाऊस झाला.
इशारा : ३१ आॅक्टोबरला कोकण, गोव्या तुरळक ठिकाणी मुसळधार, दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे़ १ नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार तर, गोव्यासह संपूर्ण राज्यात मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता़ २ नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
३१ आॅक्टोबर व १ नोव्हेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर ३१ आॅक्टोबरला पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, साताा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. १ नोव्हेंबरला औरंगाबाद, बीड, लातूर, पुणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. २ नोव्हेंबरला नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.