पावसाळ्यात कानांमध्ये बुरशी, बॅक्टेरियाचा धोका वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:08 AM2021-06-25T04:08:42+5:302021-06-25T04:08:42+5:30

पुणे : पावसाळ्यात कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कान ओले राहिल्याने संसर्गाची शक्यता वाढते. ...

The risk of fungus and bacteria in the ears increases during the rainy season | पावसाळ्यात कानांमध्ये बुरशी, बॅक्टेरियाचा धोका वाढतोय

पावसाळ्यात कानांमध्ये बुरशी, बॅक्टेरियाचा धोका वाढतोय

Next

पुणे : पावसाळ्यात कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कान ओले राहिल्याने संसर्गाची शक्यता वाढते. कोरोनानंतरही काही रुग्णांमध्ये स्टेरॉइड्स, शुगरचे वाढते प्रमाण यामुळे कानांना बुरशी होण्याचा धोका वाढतो. मात्र, नाकातील म्युकरप्रमाणे कानातील बुरशी धोकादायक नसते. कानांची व्यवस्थित स्वच्छता बाळगणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे गरजेचे असल्याचे वैद्यकतज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

पावसाळ्यात भिजल्यामुळे, दमट हवेमुळे कानात ओलसरपणा राहतो. कान नीट कोरडे न केल्यास ओलसरपणा कायम राहून त्यावर बुरशी जमा होते किंवा बॅक्टेरियाचा धोका निर्माण होतो. वातावरणात वाढलेली आर्द्रता बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीसाठी कारणीभूत ठरते. कानातील मळ आणि इअरबड्सच्या वापरामुळे झालेली किरकोळ जखमही कानामध्ये संसर्ग होण्याचा धोका वाढवू शकतात. कानात संसर्ग झाल्यास खाज सुटणे, कानदुखी, ऐकण्याची क्षमता कमी होणे, कानातून पाणी येणे, तीव्र डोकेदुखी आणि ताप यासारखी लक्षणे दिसू शकतात. कानाच्या संसर्गाचा उपचार म्हणजे कान स्वच्छ करणे, राखणे हा आहे. त्यासाठी डॉक्टरांची भेट घेऊन आवश्यक ते उपचार घेणे गरजेचे आहे, असे कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. पूर्वा लुनावत यांनी सांगितले.

-----

कोरोना काळात स्टेरॉइड्स घेतली गेल्याने कोरोनानंतर शुगर वाढते. नाकात म्युकर वाढते, त्याप्रमाणे कानात बुरशी होण्याची शक्यता असते. बुरशी किंवा बॅक्टेरिया झाल्याने खाज सुटणे, जखम होणे, कान दुखणे असे त्रास जाणवतात. मात्र, नाकातील म्युकरप्रमाणे कानातील संसर्ग धोकादायक नसतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून रुग्णांना बरे वाटते.

- डॉ. अविनाश वाचासुंदर, कान-नाक-घसातज्ज्ञ

------

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कानात बुरशी होण्याचे प्रमाण वाढते आणि ही समस्या सर्वसाधारण आहे. कोरोनाशी त्याचा संबंध नाही. कान कोरडे ठेवून, स्वतः स्वच्छता ठेवून काळजी घेता येणे शक्य आहे.

- डॉ. समीर जोशी, कान-नाक-घसातज्ज्ञ, ससून रुग्णालय

-------

काय काळजी घ्यावी?

* कानात अणकुचीदार वस्तू घालू नका.

* पावसात भिजल्यावर घरी आल्यावर कान स्वच्छ, कोरडे करा.

* नियमितपणे हेडफोन वापरत असल्यास ते साफ करण्यासाठी जंतुनाशक वापरा.

* कानात कापसाचे बोळे घालण्याची सवय असल्यास ते वारंवार बदलत रहा.

* कानातील मळ काढण्यासाठी इअर बड्सचा वापर करणे शक्यतो टाळावे.

* थंड पेयाचे अतिरिक्त सेवन केल्यास घशाचा संसर्ग झाल्यास कानावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कानात जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

Web Title: The risk of fungus and bacteria in the ears increases during the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.