पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:12 AM2021-06-09T04:12:11+5:302021-06-09T04:12:11+5:30
पुणे : पावसाळा सुरू होण्याचे संकेत मिळताच डेंगी आणि इतर साथीच्या आजारांची भीतीही निर्माण झाली आहे. कोरोनाबरोबरच आता डेंगी, ...
पुणे : पावसाळा सुरू होण्याचे संकेत मिळताच डेंगी आणि इतर साथीच्या आजारांची भीतीही निर्माण झाली आहे. कोरोनाबरोबरच आता डेंगी, चिकुनगुनिया, मलेरिया अशा आजारांचे रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच प्रशासनाकडून स्वच्छता, औषध फवारणीची कामे हाती घेण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे साथीच्या आजारांबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
कोरोनाची साथ काहीशी आटोक्यात आल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, आता माॅन्सून दाखल झाल्याने पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात साचून राहिलेल्या पाण्यामध्ये डासांची व्युत्पत्ती झाल्यास डेंगी, मलेरियाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्यामुळेच स्वच्छता आणि जनजागृतीवर आरोग्य विभागाकडून भर दिला जात आहे.
पावसाळ्यामध्ये दर वर्षी डेंगीच्या रुग्णांचे प्रमाण वाढते. त्या तुलनेत मलेरिया, चिकनगुनियाच्या रुग्णांचे प्रमाण कमी असते. २०१९ मध्ये डेंगीचे ६०४० संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी १४०७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर १० जणांचा मृत्यू झाला. २०२० मध्ये ३१४२ संशयित रुग्णांपैकी १८३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. २०२१ मे पर्यंत ९०१ संशयितांपैकी ३१ जणांमध्ये डेंगीचे निदान झाले आहे. चिकुनगुनिया किंवा मलेरियामुळे गेल्या तीन वर्षांत शहरात एकही मृत्यू झालेला नाही.
-------
वर्षे डेंगी रुग्ण चिकुनगुनिया रुग्ण
२०१९ १४०७ ७४१
२०२० १८३ ७४
२०२१ ३१ ११
-------
पावसाळ्याला सुरुवात झाल्याने महापालिकेकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. पावसाळ्यात आजूबाजूच्या परिसरात पाणी साचू देऊ नये, अडगळीचे सामान दूर करावे, काही तक्रारी असल्यास महापालिकेशी संपर्क साधावा, औषध फवारणी करून घ्यावी, कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका