महापालिकेच्या नदीकाठ सुधारणेमुळे पुराचा धोका; प्रकल्पाला पुणेकरांचा कडाडून विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 02:59 PM2023-02-03T14:59:48+5:302023-02-03T15:00:05+5:30
पुणे महापालिका मात्र हा प्रकल्प राबविण्यासाठी खूपच आग्रही असल्याचे दिसून येत आहे
पुणे : पुणे महापालिका नदीकाठ सुधार योजना राबवत असल्याने नदीकाठची अशी जागाच नष्ट होणार आहे. कारण नदीकाठी संपूर्णपणे सिमेंटीकरण करण्यात येत आहे. त्यासाठीचा प्रायोगिक प्रयोग बंडगार्डन येथील नदीकाठी केला जात आहे. नदीकाठ सुधारला पुणेकरांकडून जोरदार विरोध होत असला तरी पुणे महापालिका मात्र हा प्रकल्प राबविण्यासाठी खूपच आग्रही दिसून येत आहे.
नदीकाठी पाणथळ जागा तयार झालेली असते, त्या ठिकाणी एक परिसंस्था कार्यरत असते. तिथे कीटक, अळ्या, दलदल जमीन असल्याने पक्ष्यांना ते खाद्य उपलब्ध करून देते. नदीला पूर आल्यानंतर पाणी धरून ठेवण्याची व जिरवण्याची क्षमता या पाणथळ जागेत आहे. म्हणून तिचे संवर्धन होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीच २ फेब्रुवारी रोजी जागतिक पाणथळ प्रदेश दिन साजरा केला जात आहे.
पाणथळ जागा म्हणजे पाणवठ्यालगतची जमीन. अगदी विहिरीच्या काठावरदेखील थोडी दलदल असते, त्यालाही पाणथळ भूमी म्हटले जाते. तलावाची हद्द, नदीकाठ, खाडी किंवा नदीमुखाचा काठावरील चिखल, समुद्रकिनारा ही इतर उदाहरणे आहेत. इंग्रजीमध्ये याला वेटलॅन्ड असे नाव आहे. जैवविविधता संपन्न अशी ही जागा अतिशय महत्त्वाची आहे.
शहरातील मुठाकाठी अशी अनेक ठिकाणी पाणथळ जागा पाहायला मिळते. त्या ठिकाणी थंडीत परदेशी पक्षीही स्थलांतरित होऊन येतात. परंतु, आता पुणे महापालिका नदीकाठ सुधार योजना राबवत असल्याने नदीकाठची अशी जागाच नष्ट होणार आहे. कारण नदीकाठी संपूर्णपणे सिमेंटीकरण करण्यात येत आहे. त्यासाठीचा प्रायोगिक प्रयोग बंडगार्डन येथील नदीकाठी केला जात आहे.
नदीकाठ सुधारला पुणेकरांकडून जोरदार विरोध होत असला तरी पुणे महापालिका मात्र हा प्रकल्प राबविण्यासाठी खूपच आग्रही दिसून येत आहे. पुणेकरांचा पाठिंबा नसतानाही नदीकाठ सुधार तसाच रेटला जात आहे. यामध्ये नदीकाठची जैवविविधता नष्ट होऊन त्या ठिकाणी पुराचा धोकाही वाढणार आहे. तरी देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
दिवसेंदिवस पाणथळ जागा आक्रसून जाताहेत
नागरीकरण आणि औद्योगिकीकरण यांच्या रेट्यामुळे, पाण्याचा बेसुमार उपसा केल्याने आणि घनकचऱ्याची भर टाकण्यामुळे पाणथळ जागा आक्रसून जात आहेत. याचा अनिष्ट परिणाम जैविक उत्पादकता आणि वैविध्य यावर होत असतो. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी पाणथळ क्षेत्रांचे जतन व संवर्धन होणे जरुरीचे आहे. भारतात अशा महत्त्वाच्या ७५ रामसर पाणथळ जागा आहेत. तसेच इतर नदीकाठी, तलावाकाठी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात.
अनेक प्रजाती नष्ट होणार
गेल्या अनेक वर्षांपासून प्राणी आणि वनस्पतींच्या काही प्रजाती नामशेष होत आहेत. पाणथळ जागा या पशुपक्षी, कीटक, सरीसर्प प्रजातींच्या अधिवासाच्या जागा आहेत. या परिसरावर काही प्राण्यांचे प्रजनन होत असते. स्थलांतरित पक्षी हे केवळ पाणथळ जागांवर प्रजननासाठी येत असतात. परंतु, मुठा नदीकाठची पाणथळ जागेवर सिमेंटीकरण होत असल्याने तेथील महत्त्वाच्या प्रजाती नष्ट होणार आहेत.