‘गुटर-गु’मुळे फुप्फुसाला धोका! कबुतरांची वाढती संख्या चिंताजनक; वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 01:20 PM2022-11-15T13:20:30+5:302022-11-15T13:25:01+5:30
मुंबई-पुण्यात कबुतरांच्या विष्ठेमुळे अनेक प्रकारचे फुफ्फुसाचे आजार व श्वसनाच्या आजाराचा सामना करावा लागत आहे...
पिंपरी : अनेक शहरांमध्ये कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत जात आहे. जैवविविधतेसाठी प्रत्येक प्राणी, पक्षी गरजेचे असले तरी मात्र कबुतरांच्या वाढत जाणाऱ्या संख्येमुळे मानवी आरोग्यावरदेखील परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई-पुण्यात कबुतरांच्या विष्ठेमुळे अनेक प्रकारचे फुफ्फुसाचे आजार व श्वसनाच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेकदा पक्षी, प्राण्यांवर केली जाणारी भूतदया, मानवाला धोक्याची ठरू शकते.
पिंपरी-चिंचवड शहरातदेखील अनेक मोठ्या मार्केटमध्ये कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच शहरातील बऱ्याच सोसायट्या-अपार्टमेंटमध्येही कबुतरांचा रहिवास वाढल्याने अनेकांना कबुतरांच्या विष्ठेमुळे त्रास निर्माण होऊ लागल्याच्या तक्रारी आहेत. त्यात विशेष करून, लहान मुलं व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे अनेक नागरिकांकडून अपार्टमेंटमधील कबुतरांचा रहिवास काढून घेण्याची मागणी महापालिकेकडे केली जात आहे.
कबुतरांचे या ठिकाणी वास्तव्य
कबुतर इतर पक्ष्यांप्रमाणे केवळ झाडांवर आपला अधिवास तयार करत नाही. तर ज्या ठिकाणी खालच्या बाजूला ठोस जागा असेल त्या ठिकाणी कबुतर आपला अधिवास तयार करत असतात. यासह अनेक अपार्टमेंट, मार्केट किंवा लहान-लहान दुकानांच्या शेडमध्येही रहिवास करतात.
भूतदया येईल फुफ्फुसांशी
कबुतरांबद्दल अनेकांना सहानुभूती असते; मात्र ही सहानुभूती नागरिकांच्या आरोग्यावर बेतण्याचीही भीती आहे. त्यामुळे पक्षी, प्राणिप्रेमींकडून माहिती घेऊनच एखाद्या पक्षी, प्राण्याबद्दल आपली सहानुभूती दाखवावी.
स्वच्छतेनंतरही अनेक दिवस होतो त्रास
अपार्टमेंट किंवा खिडक्यांमध्ये कबुतरांचा अधिवास नष्ट केल्यानंतर महिनाभर तरी खिडक्यांमध्ये पडलेल्या विष्ठेचे जीवाणू कायम असतात. त्यामुळे स्वच्छता केली तरी अनेक दिवस दुर्गंधीदेखील पसरलेली असते.
कबुतरांच्या विष्ठेतून बुरशी पसरते?
तज्ज्ञांच्या मते, कबुतरांच्या विष्ठेत बुरशी आणि जीवाणू असतात. ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस आणि क्रायटोकॉकस प्रकारची बुरशी आढळून येते. कबुतरांची विष्ठा आणि पंख श्वसनाच्या आजारांना कारणीभूत आहेत. कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस बुरशी आढळून येते. यामुळे ॲलर्जी होऊ शकते, अस्थमादेखील होण्याची शक्यता असते.