नदीकाठच्या रहिवाशांना धोका
By admin | Published: July 16, 2017 03:49 AM2017-07-16T03:49:50+5:302017-07-16T03:49:50+5:30
दरवर्षी पावसाळा सुरू होताच, महापालिकेतर्फे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला जात असे़ आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत उपलब्ध करून देता
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : दरवर्षी पावसाळा सुरू होताच, महापालिकेतर्फे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला जात असे़ आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत उपलब्ध करून देता यावी, यासाठी पूरनियंत्रण कक्ष सुरू केला जात असे. अलीकडच्या काळात महापालिकेला याचा विसर पडला असून नदीकाठच्या रहिवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास महापालिका प्रशासनाला ऐनवळी धावपळ करावी लागणार आहे.
नेमेचि येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे महापालिका दरवर्षी पावसाळा सुरू होताच, पूरनियंत्रण कक्ष स्थापून त्यांच्यावर आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज होण्याची जबाबदारी सोपवली जात असे. नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरू केली जात असे. आता मात्र महापालिका प्रशासनाला याचे गांभीर्य राहिलेले नाही. पिंपरीत नदी काठी संजय गांधीनगर वसाहत आहे. नदीपात्रालगत झोपड्या आहेत. तसेच रहाटणी, दापोडी, सांगवी परिसरात नदीकाठी घरे आहेत. पावसाचा जोर वाढल्यानंतर नदीपात्र दुथडी भरून वाहते. बांधकाम व्यावासायिकांनी नदीकाठी भराव टाकल्याने पात्र उथळ झाले आहे. मध्यंतरीच्या काळात पूरस्थिती उद्भवू नये, यासाठी बंधारे फोडण्याचा प्रयोग महापालिकेने केला. मात्र त्यानंतर नदीपात्रालगत राडारोडा टाकणे सुरूच राहिले आहे. महापालिकेचे आपत्कालीन स्थितीशी सामना करण्याचे नियोजन होणे अपेक्षित आहे. असे नियोजन आणि कृती आराखडा दरवर्षी केला जात होता. त्यानुसार यंत्रणा मात्र कार्यन्वीत होत नव्हती, निदान नियोजन तरी केले जात होते. त्यामुळे महापालिकेने नदीकाठच्या रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पवना धरण क्षेत्रातील पावसाचे प्रमाण, धरणाच्या पाणी पातळीची स्थिती याची आकडेवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे रोजचे रोज अपडेट होत असे. त्यानुसार धरणाच्या पाणी पातळीत वाढ होताच, महापालिका प्रशासन नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना देत असे. सद्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संपर्क यंत्रणा कोलमडली आहे.
जनजागृतीत कमी पडल्याची अधिकाऱ्याची कबुली
महापालिकेने आपत्कालीन व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून नियोजन केले आहे. कृती आराखडा तयार आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कामाची जबाबदारी निश्चित केली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. असा दावा महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाशी संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे. महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांना तातडीक मदत कोणाकडून कशी मिळविता येईल, याची माहिती क्षेत्रिय कार्यालये, मुख्य प्रशासकीय इमारत येथे लावण्यात आलेली आहे. हेल्पलाइन क़्रमांक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात कमी पडल्याची कबुली आपत्कालीन कक्ष अधिकारी अनिल कदम यांनी दिली.