Pune: पोलीस आयुक्तांची नॉट आउट ‘मोक्का’ सेंच्युरी; वर्षभराच्या आत ६४९ आरोपींवर मोक्का
By नितीश गोवंडे | Published: December 16, 2023 06:34 PM2023-12-16T18:34:20+5:302023-12-16T18:35:18+5:30
यातून तब्बल १०० संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई केली असून, पोलिस आयुक्तांनी मोक्काचा प्रभावी वापर केल्यामुळे शहरातील अनेक संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे....
पुणे : एक वर्षापूर्वी पुणेपोलिस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारलेल्या पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी नॉट आउट ‘मोक्का’ सेंच्युरी करत ६४९ आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई केली. यातून तब्बल १०० संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई केली असून, पोलिस आयुक्तांनी मोक्काचा प्रभावी वापर केल्यामुळे शहरातील अनेक संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे.
आगामी काळातदेखील अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहणार असल्याचे सूतोवाच पोलिस आयुक्तांनी यापूर्वी अनेकदा केले आहे. बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८ नाव्हेंबर रोजी कुसळकर किराणा मालाच्या दुकानाच्या गल्लीतून एकजण जात असताना आरोपी सौरभ शिंदे, तेजस जगताप, चंदर राठोड, अनिकेत काटकर आणि पंकेज दिवेकर यांनी आपापसात संगनमत करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता.
याप्रकरणी आरोपी तेजस शंकर जगताप (वय २०, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), अनिकेत सुधीर काटकर (२२) यांना अटक केली असून, ते सध्या येरवडा कारागृहात आहेत. आरोपी सौरभ शरद शिंदे (२२), चंदर उन्नप्पा/हुन्नप्पा राठोड (२२), पंकज संजय दिवेकर (१९) हे आरोपी अजूनही फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
टोळी प्रमुख आरोपी सौरभ शिंदेने इतर सदस्यांना बरोबर घेऊन परिसरात टोळीची दहशत निर्माण करून अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी सुरू केल्याचे स्पष्ट झालेले आहे. आरोपींवर वेळावेळी प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरदेखील त्यांनी पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सविता ढमढेरे यांनी पोलिस उपायुक्त आर. राजा यांच्यामार्फत आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव अप्पर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याकडे सादर केला होता.
अर्जाची छाननी केल्यानंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त शाहूराजे साळवे करत आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त तथा सह पोलिस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सविता ढमढेरे, पोलिस उपनिरीक्षक बाळू शिरसाट, पोलिस अंमलदार दैवत शेडगे, अनिल डोळसे आणि कृष्णा फुले यांनी केली.