वशिलेबाजी न करता रितसर बदलीची संधी हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:10 AM2021-05-29T04:10:08+5:302021-05-29T04:10:08+5:30
पुणे : पोलीस दलातील बदल्यांमध्ये जेवढी पारदर्शकता असेल तेवढी महत्त्वाची आहे. ओळखीच्या किंवा वशिलेबाजी करणा-या लोकांना चांगल्या ठिकाणी ...
पुणे : पोलीस दलातील बदल्यांमध्ये जेवढी पारदर्शकता असेल तेवढी महत्त्वाची आहे. ओळखीच्या किंवा वशिलेबाजी करणा-या लोकांना चांगल्या ठिकाणी बदली मिळण्यापेक्षा रीतसर अर्ज मागवून पोलिसांना संधी दिल्यास निश्चितच एक चांगला संदेश पोहोचेल. त्यामुळे पुणे पोलिसांनी जनरल ट्रान्सफर पोलीस मॅनेजमेंट सिस्टीम (जीटीपीएमएस) ही विकसित केलेली प्रणाली अत्यंत फायदेशीर असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
राज्याच्या गृहमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्यांदाच पुण्याच्या पोलीस आयुक्तालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांना पोलीस सलामी देण्यात आली. आयुक्तालयातील भरोसा सेलमधील बाल साहायता कक्ष, महिला साहायता आणि ज्येष्ठ नागरिक कक्ष तसेच गुन्हे शाखेला त्यांनी भेट देऊन कामाची माहिती करून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
आजवर पुणे पोलिसांनी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. नुकतीच पोलिसांच्या अंतर्गत बदल्यांसाठी जीटीपीएमएस ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे, त्याचे वळसे पाटील यांनी कौतुक केले. ही प्रणाली पुण्यासह इतर ठिकाणी देखील सुरू झाली आहे. पोलीस दलातील बदल्यांमध्ये पारदर्शकता महत्त्वाची आहे. या प्रणालीचा पोलीस दलाला फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, असे वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर वळसे पाटील यांनी टीका केली. सध्या कोरोनामुळे पोलीस व आरोग्य विभागावर ताण आहे. त्यामुळे कोणीही चिथावणीखोर वक्तव्य करू नये, असा टोला त्यांनी लगावला.
सराईत गुंड वाघाटे याच्या अंत्ययात्रेला निघालेल्या रॅलीवर भाष्य करताना पोलिसांनी त्या घटनेवर योग्य ती कारवाई केली आहे. यापुढे असे प्रकार झाल्यास कडक कारवाई केली जाईल. कुठल्याही प्रकाराची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जालना येथील भाजप कार्यकर्त्याला पोलिसांनी केलेल्या मारहाणीविषयी विचारले असता ते म्हणाले, ९ एप्रिलची ही घटना आहे. कार्यकर्ते रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये (आईसीयू) गोंधळ घालत होते, त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. मात्र ही कारवाई जरा जास्तच झाली. याबाबत जालना पोलीस अधीक्षकांना सांगून त्यांच्यावर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
-------------
कायद्यात दुरूस्ती करूनच मराठा आरक्षण द्यावे लागेल
छत्रपती संभाजीराजे यांनी येत्या ६ जूनपर्यंत मराठा आरक्षणावर कोणता निर्णय झाला नाही तर रायगडापासून आंदोलनाला सुरुवात करू, असा इशारा दिला आहे. त्यावर वळसे पाटील म्हणाले, न्यायालयाने एकदा निर्णय दिल्यानंतर तो सर्वाना बंधनकारक राहातो. यासाठी आता केंद्रालाच कायद्यात सुधारणा किंवा घटनादुरुस्ती करावी लागेल आणि या मराठा आरक्षणाला संरक्षण द्यावे लागेल.