भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत, अनेक गावांमध्ये पाण्यासाठी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 02:36 AM2018-05-07T02:36:21+5:302018-05-07T02:36:21+5:30
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने परिसरातील खरोशी, डेहणे, शेंदुर्ली, वांजाळे, धुवोली, शिरगाव, टोकावडे या काठावरील गावांत जनावरांना, तसेच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भीमा नदीच्या काठावरील असलेल्या शेतातील हिरवीगार पिकेदेखील पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे चासकमान धरणातून पाणलोट क्षेत्रासाठी पाणी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
डेहणे - खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने परिसरातील खरोशी, डेहणे, शेंदुर्ली, वांजाळे, धुवोली, शिरगाव, टोकावडे या काठावरील गावांत जनावरांना, तसेच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भीमा नदीच्या काठावरील असलेल्या शेतातील हिरवीगार पिकेदेखील पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे चासकमान धरणातून पाणलोट क्षेत्रासाठी पाणी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
भीमा नदीच्या पाण्यावर दौंड व शिरूर या तालुक्यातील अनेक बंधारे भरून वाहत आहेत, तर अनेक खासगी तळी भरून ठेवण्यात आली आहेत. चासकमान धरणावर शिरूर व दौंड तालुक्यातील शेती समृद्ध होत असताना ज्या लोकांनी या धरणासाठी जमीन दिली, त्या पश्चिम भागातील गावं मात्र तहानलेली आहेत. नदीची पाणीपातळी तळाला गेली असून, कृषिपंप नदीच्या मध्यावर असूनही नदी कोरडी ठणठणीत पडल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी शिल्लक राहिलेल्या नदीच्या खोलगट भागात (डोह) आणि झरे यामधून शेतकरी पाणी नेऊन पिके जगवण्याची धडपड करत आहेत. भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने या परिसरात शेतीच्या पाण्याबरोबरच जनावरांना, तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकामागोमाग एक आवर्तन चालू असल्याने नदीपात्रातील तळ उघडा पडला आहे. मागील काही दिवसांपूर्र्वी धरणातून आवर्तन सोडताना या भागातील शेतकऱ्यांचाही विचार करावा, अशी मागणी होत होती. परंतु, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. यापुढे तरी धरणातून पाणी सोडू नये, अशी मागणी येथील शेतकरी तसेच ग्रामस्थ करीत आहेत.
आदिवासी भागातील गावांमधील पशुधन जगवणे यामुळे कठीण झाले आहे. पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न दुग्धउत्पादक शेतकºयांना सतावत आहे. गेल्या तीन वर्षांपासून या गावांतील रब्बी हंगाम पाण्या अभावी वाया गेला आहे. दरवर्षी या भागात मुबलक प्रमाणात पाऊस पडत असतो. परंतु, पाणी अडवण्याचे नियोजन नसल्याने शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे पशुधन कसे जगवायचे, हा प्रश्न त्यांना पडला आहे.
बंधारे कागदावरच....
-पश्चिम भागातील आदिवासी भागात भीमा नदीवर किमान नऊ ठिकाणी बंधारे बांधता येऊ शकतात. कृष्णा खोरे लवादाच्या नियमांतर्गत हे काम होऊ शकते. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रस्ताव दिला असल्याचे अनेक वर्षे सांगितले जात आहे.
-हक्काचे पाणी व पाणीटंचाईपासून मुक्तता हवी असेल तर बंधाºयांसाठी जनमताचा रेटा हवा. अशा प्रकारच्या बंधाºयांना जमीन लागणार नाही, धरणांतर्गत काम होणार असल्याने त्यामुळे कुणीही विस्थापित होण्याची शक्यता नाही. बंधारे केल्याचे फायदे मात्र अनेक आहेत. पावसाळा संपला की अवघ्या दोनेक महिन्यातच नदीचे पात्र कोरडे होते. ठिकठिकाणी बंधारे असतील तर सहा महिन्यांपर्यंत पाणी थोपवले जाऊ शकते.
गावे तहानलेली
भीमा नदीपात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक राहिला नाही. तसेच, विहिरी, कूपनलिका इत्यादी पाण्याचे स्रोत केव्हाच आटून गेले आहेत. या परिसरातील गावे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी निकषात बसत नसल्याने अनेक गावे व वाड्या-वस्त्या तहानलेल्या असल्याचे या परिसरात पाहायला मिळत आहे. माणसालाच वेळेला पिण्यासाठी पाणी मिळत नाही, तर जनावरांचे काय? अशी दुर्दैवी वेळ दुग्धउत्पादकांवर आली आहे.