नदीचे पात्र कोरडे; पिके जळाली
By Admin | Published: June 2, 2017 01:50 AM2017-06-02T01:50:01+5:302017-06-02T01:50:01+5:30
नीरा नदीकाठचा पाणीप्रश्न जटिल झाला आहे. नदीकाठच्या परिसरातील शेतकऱ्यांचा उद्रेक वाढू लागला आहे.नीरेचे पात्र
लोकमत न्यूज नेटवर्क
बावडा : नीरा नदीकाठचा पाणीप्रश्न जटिल झाला आहे. नदीकाठच्या परिसरातील शेतकऱ्यांचा उद्रेक वाढू लागला आहे.
नीरेचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने ऊस, फळबागा पाण्यावाचून वाळून गेल्या आहेत. तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही गंभीर झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी चार-पाच किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. मागील महिन्यात नदीपात्रात धरणांमधून त्वरित पाणी सोडण्यासाठी बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली सराटी येथे इंदापूर-अकलुज रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले होते.
त्यावेळी तहसीलदारांनी लवकरच कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मागील आठवड्यात निर-निमगाव येथे नदीपात्रात गुरा-ढोरांसह शेतकऱ्यांनी आंदोलन करून पालकमंत्री व आमदाराच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पोतराजाच्या ढोलकीच्या निनादात आरती घेतली होती. या वेळी शेतकऱ्यांच्या भावना ऐकून घेण्यासाठी महसूल विभागाचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता.
सिंचन भवन : मोर्चाचा इशारा
या प्रश्नावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुण्याच्या सिंचन भवनावर मोर्चाचा इशारा दिला आहे. तर नदीपात्रात प्राणांतिक उपोषणाचा इशारा राष्ट्रवादी किसान सभेचे तालुकाध्यक्ष तुकाराम घोगरे, उपाध्यक्ष सुखदेव निकम यांनी दिला आहे.