नदी सुधारणेची ऐसीतैशी : स्मार्ट योजना कागदावर, कृती शून्य; पालिकेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 05:09 AM2017-09-25T05:09:12+5:302017-09-25T05:09:21+5:30
नदी सुधारणेसाठी हजार कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येणार असलेल्या जायका प्रकल्पाला मंजुरी मिळून दोन वर्षे उलटली, तरी अद्याप त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही.
पुणे : नदी सुधारणेसाठी हजार कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येणार असलेल्या जायका प्रकल्पाला मंजुरी मिळून दोन वर्षे उलटली, तरी अद्याप त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्याच वेळी नदी स्वच्छतेसाठी पूर्वापार अवलंबल्या जाणाºया छोट्या मात्र महत्त्वाच्या बाबींकडेही पालिकेकडून मोठ्या प्रमाणात
दुर्लक्ष होत आहे. शहरातील
पुलांवर तसेच नदीपात्राच्या बाजूने ठेवण्यात आलेले निर्माल्य कलश गायब झाले असून, त्याकडे लक्ष देण्यात पालिका प्रशासनाला अद्याप वेळ मिळालेला नाही.
शहरात सध्या नवरात्रोत्सवाची धूमधाम सुरू आहे. उत्सवाच्या काळात घराघरातून मोठ्या प्रमाणात निर्माल्य तयार होते. निर्माल्य संकलित करण्यासाठी पालिकेकडून शहरात ठिकठिकाणी कलशांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र अचानक हे कलश गायब झाल्याने शहरात दररोज संकलित होणारे शेकडो टन निर्माल्य थेट नदीमध्ये पडू लागले आहे. त्याचबरोबर काही जणांकडून ते नदीत न टाकता ते पुलावरच पूर्वी ठेवण्यात आलेल्या कलशांच्या जागेवर टाकण्यात येत आहे. त्यामुळे तिथे निर्माल्यांचे ढीग साचू लागले आहेत.
प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवलेले हे निर्माल्य इतरत्र पसरू लागले आहे. ‘निर्माल्य इथे ठेवण्यात आलेल्या कलशामध्ये टाकावे,’ असे आवाहन करणारे फलक पालिकेने लावले होते. परंतु, फलकच आता कलशाची वाट पाहू लागले आहेत. नदीसुधारणेसाठी मोठे प्रकल्प राबविण्याच्या निव्वळ घोषणा करण्याऐवजी या छोट्या मात्र महत्त्वाच्या गोष्टींकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.
नागरिकांनी कलशात टाकलेल्या निर्माल्याचा वापर सेंद्रिय खतनिर्मितीसाठी केला जाईल, असे स्पष्ट करून ते संकलित करण्यासाठी पूर्वी पालिकेकडून सातत्याने प्रयत्न होत होते. शाळा, महाविद्यालयांमधून जनजागृती करण्यात आली. परिणामी नागरिकांना निर्माल्य नदीत न टाकता कलशात टाकण्याचे महत्त्व पटू लागले होते. निर्माल्य कलश ओसंडून वाहत होते. मात्र अचानक ठिकठिकाणचे निर्माल्य कलश गायब झाले आहेत. नागरिकांमध्ये निर्माण झालेली स्वयंशिस्तीला पालिकेच्या हलगर्जीपणामुळे बाधा येत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाकडूनच हे कलश हलविण्यात आले की परस्पर कोणी उचलून नेले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महापालिकेकडून दरवर्षी कलशामध्ये संकलित होणारे निर्माल्य खतनिर्मितीसाठी पाठविण्याच्या व्यवस्थेसाठी विशिष्ट आर्थिक तरतूद करण्यात येते. तरीही निर्माल्य कलशांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.