नदी जगायला शिकवते, मरायला नव्हे! - बंडगार्डन पुलावरून जीवन संपविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:15 AM2021-08-18T04:15:45+5:302021-08-18T04:15:45+5:30
नदी जगायला शिकवते, मरायला नव्हे. नदीत कितीही अडथळे आले, तरी ती मार्ग काढत प्रवाही राहते. तिचा प्रवास कुठेच थांबत ...
नदी जगायला शिकवते, मरायला नव्हे. नदीत कितीही अडथळे आले, तरी ती मार्ग काढत प्रवाही राहते. तिचा प्रवास कुठेच थांबत नाही. नदीकाठी जीवनाला सुरुवात होत आणि तिथूनच आपली संस्कृती सुरू झाली. जिथे नदी तिथे वस्ती करणे ही परंपरा आहे. कारण पाण्याशिवाय कोणी जगू शकत नाही. पण गेल्या काही वर्षांपासून नदी आणि पुणेकर यांचे नातेच तुटलेले पाहायला मिळते. केवळ फोटोसेशनपुरते नदीकाठी पुणेकर येतात. काही संवेदनशील पुणेकर आहेत, जे स्वच्छतेसाठी धडपडतात. नदीकाठी पुन्हा पूर्वीचे हसतखेळत जगणारी संस्कृती सुरू व्हावी, अशी अपेक्षा नदीवर प्रेम करणाऱ्यांची आहे.
————————————
नदीत उडी मारून जीवन संपविणाऱ्या तरुणाविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भक्ती वारे म्हणतात, मानसिक स्थिती योग्य नसल्याने हा प्रकार घडतो. मन ‘अनहेल्दी’ असेल तर चांगला विचार पुढे येत नाही. विवेक जागृत असणे आवश्यक आहे. ज्याने त्या तरुणाला वाचवले, त्याचे मन हेल्दी म्हणायला हवे. त्याच्यात संवेदनशीलता आहे. तशी माणसं वाढायला हवीत. नदी आणि जगणं यांना जोडणारी काही संवेदनशील माणसं आहेत. ते रोजच्या गरजांपेक्षा, क्षमतांपेक्षा अधिक व विचार करून नदीवर प्रेम करतात. त्यांना स्वत:सोबतच नदीचे आरोग्य जपायचे आहे. या विषयीची जागृती समाजात अधिक रूजायला हवी. त्यासाठी प्रयत्न करायला हवा.’’
————————-
नदीसारखं प्रवाही राहा...
नदीकाठी गेल्यावर खूप काही शिकायला मिळतं. नदी म्हणजे आपल्या भावना ‘डंप इन’ करायची जागा आहे, असे ‘नदीष्ट’चे लेखक मनोज बोरगावकर सांगतात. ‘‘नदी जगायला शिकवते, मरायला नाही. ती प्रवाही असली की, आपोआप शुद्ध होऊन जाते. तसेच आपण जगत राहिले पाहिजे.’’
——————————————