नद्यांमधून सर्रास पाणीचोरी
By admin | Published: May 13, 2016 01:02 AM2016-05-13T01:02:39+5:302016-05-13T01:02:39+5:30
दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्याने शहरवासीय हैराण आहेत, तर दुसरीकडे पवनेतील पाणी चोरून थेट बांधकाम व्यावसायिकांना पुरविले जात आहे
विश्वास मोरे, पिंपरी
दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्याने शहरवासीय हैराण आहेत, तर दुसरीकडे पवनेतील पाणी चोरून थेट बांधकाम व्यावसायिकांना पुरविले जात आहे. हॉटेल, मंगल कार्यालये, व्यापारी संकुले, गृहनिर्माण सोसायट्यांची पाणीपुरवठ्याच्या नावाखाली लूट केली जात आहे. पिण्याच्या पाण्याचा धंदा टँकरमाफियांनी सुरू केला आहे. अधिकारी-लोकप्रतिनिधी आणि टँकर लॉबीची मिलीभगत असल्याने टँकरमाफियांना आवरणार कोण, हा खरा प्रश्न आहे. लोकमतने इंद्रायणी, पवना, मुळा नदीपात्राच्या परिसरात पाहणी केली. त्या वेळीनदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर टँकरने पाणी उचलून विकले जात असल्याचे स्टिंग आॅपरेशनद्वारे निदर्शनास आले. सकाळी१० ते दुपारी २ या वेळेत नदी परिसराची पाहणी केली.
पवना धरणातून पाणी नदीत सोडल्यानंतर रावेत येथील जलउपसा केंद्रात येते. तेथून हे पाणी प्रक्रिया करून टाक्यातून शहरातील नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचविले जाते. त्यात मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे, हे वास्तव आहे. ती रोखण्यासाठी पाणीपुरवठा विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. रावेत बंधारा ते दापोडीपर्यंतच्या भागात अनेक ठिकाणी पाणी टँकरमध्ये भरून बांधकाम व्यावसायिकांना पुरविले जाते. तसेच रावेत बंधाऱ्याच्या खाली काही ठिकाणी पाणी साचण्यासाठी जागा तयार करून तेथून पाणी उचलले जाते. या पाणीचोरीवर कोणाचाही निर्बंध नाही.
आणि तो टँकर पोहोचला बांधकामांवर
रावेत येथील जलउपसा केंद्राजवळील स्मशानभूमीच्या जवळ एक टँकर भरून रावेतच्या रस्त्याने पुढे गेला. तेथून जवळच असणाऱ्या बास्केट ब्रिजजवळील नदीकाठी सव्वादहाच्या सुमारास टँकर भरून तो टँकर भोंडवे चौकातून डी मार्टजवळ असणाऱ्या एका बांधकामावर नेला. तिथे हा टँकर खाली करण्यात आला. ताथवडेच्या दिशेने आलेला एक टँकर बास्केट ब्रिज चौकातून भोंडवे चौक डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या दिशेने गेला. पुढे या रस्त्यावर असणाऱ्या बांधकाम प्रकल्पावर थांबला.
स्थानिकांचेच टँकर अधिक
थेरगाव ते ताथवडे रस्त्यावर मोशी, चिखली, तळवडे परिसरात मोठ्या प्रमाणावर टँकर उभे असल्याचे दिसून येतात. त्यांच्यावर सेव्ह वॉटर असे स्लोगन लिहिले आहे. मात्र, रस्त्याने हेच टँकर हजारो लिटर पाणी सांडवत जातात. त्यावरील नावांवरून ते स्थानिकांचेच अधिक असल्याचे दिसून आले. सकाळी साडेअकराच्या सुमारास बास्केट ब्रिज सोडल्यानंतर दोनशे मीटरवरही एका ठिकाणी टँकरमध्ये पाणी भरत असल्याचे दिसून आले. तेथून दुपारी दीडच्या सुमारास मागील बाजूस असणाऱ्या टाक्यांच्या परिसरातून ड प्रभाग कार्यालयात मोठ्या प्रमाणावर टँकर भरून नेले जातात. येथील एक टँकर काळेवाडी चौकातून वाकडच्या दिशेने जाऊन मानकर चौकातून कस्पटे वस्ती येथील एका हॉटेलसमोर थांबला. तर दुसरा टँकर सोळा नंबरच्या दिशेने जाऊन थेट एका सोसायटीत पोहोचला. महापालिकेच्या टाक्यावरून टँकर भरण्याची अशीच परिस्थिती अ, ब, क, ड, इ, फ अशा प्रभागांतील टाक्यांवरही दिसून आली. थेट महापालिकेच्याच वाहिनीस मोटर लावूनही पाणी उचलले जात आहे.
बोअरवेलद्वारे पाण्याचा उपसा
शहरात पाण्याची कपात केली असली, तरी पवना, इंद्रायणी नदीतील पाणी उचलणाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. टँकरमाफिया काही ठिकाणी मोटर लावून, तर काही ठिकाणी नदीशेजारी असणाऱ्या बोअरवेलमधील पाणी उचलत असल्याचे दिसून आले. रावेत, किवळे, वाल्हेकरवाडी, रहाटणी , चिखली, तळवडे, वाकड परिसरातही अनेक ठिकाणी शेतकरी मोटारीद्वारे पाणी उचलत असल्याचे दिसून येत आहे.
प्रशासनाची डोळेझाक
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केवळ पिण्यासाठी पवना धरणातून पाणी सोडले जात आहे. मात्र, पाणीचोरीवर महापालिका प्रशासनाचे किंवा जलसंपदा विभागाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. हेतुपुरस्सरपणे डोळेझाक केली जात आहे. पाणीकपात करताना नदीचे पाणी बांधकामांना वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू, विशेष पथक नेमू, असे आयुक्तांनी जाहीर केले होते. मात्र, टँकरमाफिया दिवसाढवळ्या पाण्याची चोरी करून मनमानी दराने बांधकाम व्यावसायिकांना विकत आहेत, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.पाणी उपशावर नाही निर्बंध
दुष्काळी परिस्थितीत खासगी विहिरीतून केवळ पिण्याचे पाणी उचलण्यास परवानगी असते. मात्र, शहरात दिवसाआड पाणीपुरवठा झाला आहे. कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, खासगी टँकर चालकांकडून होणाऱ्या पाणी उपशावर महापालिका किंवा जलसंपदा विभागाचे नियंत्रण नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे टँकर लॉबीला रान मोकाट झाले आहे.