‘आरओ प्लँट’ सील, पण छुप्या पद्धतीने पाण्याची विक्री
By राजू हिंगे | Updated: February 11, 2025 10:20 IST2025-02-11T10:19:31+5:302025-02-11T10:20:28+5:30
आरओ प्लँटला बाहेरून कुलूप, पण मागील दरवाजाने पाणी विक्री सुरू

‘आरओ प्लँट’ सील, पण छुप्या पद्धतीने पाण्याची विक्री
पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील विविध भागातील अनेक खासगी पाणी शुद्धीकरण प्रकल्पांतील (आरओ प्लँट) पाणीदेखील दूषित असल्यामुळे महापालिकेने त्यांना सील केले होते. पण यापैकी काही प्रकल्पांच्या ठिकाणी चक्क बाहेरून कुलूप लावले असले तरी मागील दरवाजाने ते प्रकल्प सुरू आहेत. गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजार आटोक्यात येत असतानाच टाळे ठोकलेले आरओ प्रकल्प चोरीछुपे सुरू असल्यामुळे नागरिकांच्या जीवाशी एकप्रकारे खेळ सुरू आहे.
सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, धायरी, डीएसके विश्व, आंबेगाव या गावांमध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस)चे रुग्ण मोठ्या संख्येने आढळले होते. त्यानंतर महापालिकेच्या विहिरीतील पाण्याची तपासणी केल्यानंतर पाणी दूषित नसल्याची माहिती पुढे आली होती.
त्यानंतर खासगी टँकर भरणा केंद्र, खासगी टँकरमधील पाण्याची तपासणी केल्यानंतर संबंधित पाण्यात ई-कोलाय व अन्य जीवाणू असल्याचे तपासणी अहवालातून समाेर आले होते. त्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून संबंधित टँकर भरणा केंद्र व खासगी टँकर यांना केवळ लेखी पत्र दिले होते. तसेच त्यांना पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडर नेण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केले होते.
संबंधित गावांमध्ये शुद्ध पाणी म्हणून आरओ प्लॅंट चालकांकडून पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जात होता. संबंधित पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले होते. ३० आरओ प्रकल्पांतील नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी १९ प्रकल्पांमधील पाणी दूषित असल्याचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला होता. त्यानंतर पालिकेने हे आरओ प्रकल्प सील केले असून, परवानगीशिवाय ते सुरू करू नयेत, अशा सूचना केल्या आहेत. हे प्रकल्प सुरू करण्यासाठी नियमावली केली असून, त्याची पूर्तता केल्याशिवाय ते सुरू केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. असे असतानाही काही प्रकल्पांच्या ठिकाणी पाण्याच्या एटीएममधून पाणी विक्री केली जात आहे, तर काही ठिकाणी मागील बाजूने पाण्याचे जार भरले जात आहेत. महापालिका जीबीएसला अटकाव करण्यासाठी प्रयत्न करत असताना हे आरओ चालक नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत.
पालिकेकडे मनुष्यबळाचा अभाव
महापालिकेने आरओ प्रकल्प सील केल्यानंतर ते पुन्हा सुरू केले आहेत का? याची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, एकदा सील केल्यानंतर या प्रकल्पाची कोणतीही तपासणी केली जात नाही. याबाबत पालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मनुष्यबळाचा अभाव असल्याने या प्रकल्पाची पुन्हा तपासणी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेने सील केलेले काही आरओ प्रकल्प छुप्या पद्धतीने सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या संबंधित प्रकल्पांवर पालिका कडक कारवाई करणार आहे. - नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका