जड वाहतुकीने रस्ता खचला

By admin | Published: July 8, 2017 01:59 AM2017-07-08T01:59:18+5:302017-07-08T01:59:18+5:30

सासवड-कापूरव्होळ मार्गावरील नारायणपूर-चिव्हेवाडी घाटरस्ता ते बालाजी मंदिर (केतकावळे)दरम्यान रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत

Road closure with heavy traffic | जड वाहतुकीने रस्ता खचला

जड वाहतुकीने रस्ता खचला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : सासवड-कापूरव्होळ मार्गावरील नारायणपूर-चिव्हेवाडी घाटरस्ता ते बालाजी मंदिर (केतकावळे)दरम्यान रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत. तसेच ,साईडपट्ट्याही वाहून गेल्याने घाटरस्त्याला तीव्र उतार निर्माण झाला आहे. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून वारंवार अपघात होत आहेत. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटारच नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहते. परिणामी खड्डे पडतात. रस्ता जागोजागी उखडत आहे. या मार्गावरून टोल चुकविण्यासाठी जड वाहतूकही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या जड वाहतुकीमुळे रस्ता खचण्याचे तसेच खड्डे पडण्याचे प्रकार घडत आहेत.
घाटरस्ता हा बहुतांशी अरुंद आहे. झाडेझुडपे वाढल्याने वळणाचा अंदाज न आल्याने चारचाकी वाहने अपघाताला बळी पडत आहे. पावसाळ्याच्या हंगामासह वर्षभर. किल्ले पुरंदर, नारायणपूर, बालाजी मंदिर परिसरात पर्यटकांची गर्दी असते. काही उत्साही पर्यटक सेल्फी काढण्यासाठी ऐन घाटात, धबधबा पाहून वाहने रस्त्यातच उभी करतात. यामुळे इतर पर्यटकांना विनाकारण त्रास सोसावा लागतो. देवडी फाट्यावरून पुढे गेले, की लगेचच उतारावरील रस्ता पूर्णत: उखडलेला आहे. येथे वाहनांना नक्की कोणत्या मार्गाने जावे, असा प्रश्न पडतो.
या वळणावळणाच्या रस्त्यावर दिशादर्शक फलक नाममात्र आहेत. तसेच, दिशादर्शक फलक उखडलेले आहेत. भंगार गोळा करणाऱ्यांचे ते लक्ष्य ठरतात. रस्त्याला रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीचा प्रवास करताना रस्त्याच्या रुंदीचा अंदाज येत नाही व दुचाकीचालक नाल्यात घसरून पडतात.

पुरंदर सार्वजनिक बांधकाम स्थानिकस्तर विभाग हा फक्त नावालाच आहे. शाखा अभियंता व उपअभियंता हे असून नसल्यासारखेच आहेत. कार्यालयीन वेळेत ते उपलब्ध नसतात. भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता संपर्क क्षेत्राच्या कायम बाहेर असतात.

न्हावीसांडस रस्त्याची दुरवस्था

तळेगाव ढमढेरे : न्हावी सांडस - तळेगाव ढमढेरे रस्त्याची एक किलोमीटरपर्यंत मोठी दुरवस्था झाल्याने नागरिकांचे पावसाळ्यात हाल होत आहेत.
तळेगाव ढमढेरे - न्हावी सांडस रस्ता विठ्ठलवाडी जोड रस्त्यापर्यंत साधारण चार किलोमीटरचा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी टप्प्याटप्प्यात तळेगाव ढमढेरेपासून, तसेच विठ्ठलवाडी रस्त्यापासून तीन किलोमीटरपर्यंत भक्कम स्वरूपाचे डांबरीकरण झालेले आहे. परंतु मधल्या एक किलोमीटरच्या रस्त्याची मात्र अतिशय दयनीय अवस्था झाल्याने विशेषत: या रस्त्याने ये-जा करणारे शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, कामगार व शालेय विद्यार्थी यांचे सध्याच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साचते, चिखलमय रस्ता होत असल्याने दुचाकी गाड्या घसरतात. यामुळे नागरिकांचे या रस्त्याने ये-जा करीत असताना हाल होत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची समस्या जैसे थे आहे. नागरिक व ग्रामपंचायत गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेकडे सतत रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करीत आहे.

या रस्त्यासाठी जिल्हा परिषदेकडे वारंवार पाठपुरावा केल्याने जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजन समितीमधून या एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. टेंडर पास झाल्याबरोबर या रस्त्याचे भक्कम स्वरूपात डांबरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. हे काम झाल्यानंतर या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.
- गोविंद ढमढेरे, सदस्य-ग्रामपंचायत, तळेगाव ढमढेरे

Web Title: Road closure with heavy traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.