रस्ता, रेशन दुकानातील भ्रष्टाचारावर सरबत्ती
By Admin | Published: May 15, 2016 12:39 AM2016-05-15T00:39:05+5:302016-05-15T00:39:05+5:30
सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमाला दौंडपाठोपाठ बारामती शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बारामती : सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमाला दौंडपाठोपाठ बारामती शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात जोरदार वादळी पाऊस होऊनदेखील या कार्यक्रमासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. थेट नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांसह विविध अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी या निमित्ताने बारामतीकरांना मिळाली. शहरातील साठवण तलावापासून रस्ता, रेशन दुकानातील भ्रष्टाचार आदी विषयांवर वाचकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. शशांक मोहिते यांनी सुरुवातीला ‘लोकमत आपल्या दारी’ या माध्यमातून सामान्य नागरिकांना समस्या मांडण्याची संधी मिळणार असल्याचे मत व्यक्त केले. मोहिते म्हणाले, की माझे एमआयडीसी परिसरात वास्तव्य आहे. बँक आॅफ महाराष्ट्र परिसरात मोठा ‘रेसिडेन्शीअल’भाग आहे. सुशिक्षित नागरिकांना काही दिवसांपासून सुरू झालेल्या लॉजमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. या ठिकाणी स्कार्प बांधून आलेल्या मुली, महिलांची, युवक आणि पुरुषांसमवेत सतत वर्दळ असते. याबाबत विस्तृतपणे सांगण्याची गरज नाही. मात्र, या प्रकाराचा येथील रहिवाशांवर परिणाम झाला आहे. पोलीस प्रशासनाने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच, नगरपालिका प्रशासनाने बाहेर हातगाड्यांवर उपलब्ध असणाऱ्या खाद्य पदार्थांची स्वच्छता ठेवण्याबाबत दक्षता घ्यावी.
यावर पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे म्हणाले, की रजिस्टर नोंदणी अद्ययावत ठेवण्याबाबत पोलिसांनी संबंधित व्यावसायिकाला सूचना दिल्या आहेत. याशिवाय नोंदणी पुस्तकाची नियमित तपासणी होते. आगामी काळात कडक तपासणी केली जाईल. या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांची माहिती, मोबाईल नंबर, ओळखपत्राच्या झेरॉक्स असणे बंधनकारक आहे, याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. येथील नागरिकांची तक्रार दूर करण्याचा पोलीस प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करेल. तर, नगराध्यक्ष जगताप म्हणाले, की नगरपालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने नुकतेच अतिक्रमण करून सुरू केलेले रस्त्यावरील व्यवसाय बाजूला घेण्यात आले. या व्यावसायिकांसाठी बारामती शहरात पहिला हॉकर्स झोन सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी सर्वसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
बसपाचे प्रदेश सचिव काळूराम चौधरी त्यावर म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानानुसार व्यवसाय करण्याचा अधिकार दिला आहे. बारामती शहरातील अनेक बड्या लोकांचे अतिक्रमण आहे. नगरपालिका प्रशासनाने प्रथम या मोठ्या लोकांवर अतिक्रमण कारवाई करावी. त्यानंतरच सर्वसामान्य व्यावसायिकांवर कारवाई करावी. मोठ्यांना सोडून गरिबांवर अन्याय करू नये. तांदूळवाडी परिसरातील जगन्नाथ जाधव म्हणाले, की जीवन प्राधिकरणकडून ८ ते १० हजार रुपये खर्च करून नळ जोड पाणीपुरवठ्यासाठी घेतला. त्या वेळी २४ तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात हे आश्वासन पाळले गेले नाही. सध्या मध्यरात्रीदेखील पाणी सोडले जात आहे. रात्री उठून पाणी भरण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. त्यातून चोरीसारखे प्रकार घडण्याची भीती आहे. यावर नगराध्यक्ष जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याबाबत नगर परिषद कार्यालयात बोलावून सूचना देऊ, असे सांगितले.