रस्त्यावरच्या सिलिंडरमुळे वाहतुकीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:12 AM2021-02-09T04:12:54+5:302021-02-09T04:12:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रस्त्यावरच होणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅस वितरणाने वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना अडथळा होत आहे. सार्वजनिक जागेतील सिलिंडरच्या ...

Road cylinders obstruct traffic | रस्त्यावरच्या सिलिंडरमुळे वाहतुकीस अडथळा

रस्त्यावरच्या सिलिंडरमुळे वाहतुकीस अडथळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रस्त्यावरच होणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅस वितरणाने वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना अडथळा होत आहे. सार्वजनिक जागेतील सिलिंडरच्या वाहतुकीकडे पोलिसांचे सपशेल दुर्लक्ष आहे. फुकटात जागा वापरायला मिळत असल्याने वितरकांचा मात्र यात फायदा आहे.

शहरातील पेठांमध्ये व उपनगरांमध्येही असे प्रकार होत आहेत. रस्त्याच्या कडेची मोकळी जागा पाहून तिथेच वितरक त्या परिसरातील सर्व गॅस टाक्या उतरवतात. वितरकाचे कर्मचारी सर्व टाक्या नीट लावून ठेवतात व नंतर त्याच जागेवरून परिसरातील ग्राहकांना सायकल किंवा दुचाकीवरून व मोठी सोसायटी असेल तर टेंपोतून गॅसटाकीचे वितरण करतात. अनेकदा जवळच राहणारा ग्राहकही त्याची रिकामी टाकी घेऊन येतो व भरलेली टाकी स्वत:च घेऊन जातो.

यामुळे त्या रस्त्यावरच्या वाहतुकीला अडथळा होत आहे. सनसिटी रस्त्यावर दोन ठिकाणी अशी स्वयंघोषित गोदामे सुरू आहेत. धायरी, येरवडा व अन्य उपनगरांमध्येही रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत गॅसटाक्यांचे वितरण केले जात असते. पेठांमध्येही काही भागांत आता मोठ्या प्रमाणात या पद्धतीने गॅस वितरण होते. नियमानुसार गॅस वितरकाने गॅसची टाकी ग्राहकांच्या घरी नेऊन देणे अपेक्षित आहे.

टाक्यांच्या या देवघेवीत रस्त्यावरच्या लहानमोठ्या वाहनांना अडथळा पार करण्याची कसरत करावी लागते. टेंपोत टाक्या भरणे, रिकाम्या टाक्या खाली उतरवणे यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. वळणाऱ्या रस्त्यावर कोपऱ्यात अशी मोकळी जागा असतेच, नेमकी ती हेरून तिथे गॅस टाकी वितरणाचे काम चालते. पोलिसांकडून याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. रस्त्यावर असा कोणताही अडथळा निर्माण करणे कायद्याने गुन्हा आहे, मात्र एखाद्या वितरकावर यावरून कारवाई केल्याचे एकही उदाहरण नाही.

चौकट

“कोरोना टाळेबंदीकाळात गल्लीबोळ बंद होते तेव्हाची ही व्यवस्था आहे, कारण वाहने आतपर्यंत जाऊ शकत नव्हती. ग्राहकांकडून मागणी असल्यानेच या पद्धतीने वितरण होते. वाहतुकीला अडथळा होत असेल असे वाटत नाही. टाळेबंदीच्या कालखंडात एकदाही गॅसटाकीच्या टंचाईची ओरड झाली नाही यात आमच्या डिलिव्हरीबॉयचेच कष्ट आहेत.”

-उषा पूनावाला, प्रदेशाध्यक्ष, ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रिब्यूटर्स फेडरेशन

Web Title: Road cylinders obstruct traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.