खचलेल्या रस्त्याला पालिकेचा अाधार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 09:24 PM2018-07-11T21:24:27+5:302018-07-11T21:26:02+5:30
संचेती चाैकातील रस्ता बुधवारी दुपारी अचानक खचला. सुदैवाने त्यावेळी तेथे कुठलेही वाहन नसल्याने कुठलाही अपघात झाला नाही. पालिकेने याची तातडीने दखल घेऊन रस्ता दुरुस्त केला.
पुणे : गर्दीच्या शिवाजीनगर भागातील संचेती चाैकातील रस्ता दुपारच्या सुमारास अचानक खचला. सुदैवाने रस्ता खचला त्यावेळी कुठलेही वाहन त्या ठिकाणी नसल्याने माेठा अनर्थ टळला. महापालिकेने या घटनेची तात्काळ दखल घेत रस्ता दुरुस्त केला. या रस्ताच्या खालील जलवाहीनीचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात अाले हाेते. त्यानंतर एका कंत्राटदाराकडून महापालिकेने हा रस्ता पूर्ववत करुन घेतला. परंतु कंत्राटदाराने याेग्यरितीने हा रस्ता पूर्ववत न केल्याने ताे बुधावारी खचला, त्यामुळे ज्या कंत्राटदाराने नंतर हा रस्ता तयार केला त्याच्यावर महापालिका कारवाई करणार का ?,असा प्रश्न अाता उपस्थित केला जात अाहे.
पुण्यातील संतेची चाैक हा वर्दळीचा भाग अाहे. पुणे विद्यापीठ, पाषाण, बाणेर, अाैंध या शहराच्या महत्त्वाच्या भागांमधून माेठ्याप्रमाणावर वाहने जंगली महाराज रस्त्याकडे जाण्यासाठी या चाैकात येत असतात. दरराेज माेठी वाहतूक या भागातून हाेत असते. बुधवारी शिवाजीनगरकडून संचेती चाैकाकडे येणाऱ्या रस्त्याच्या चाैकातील काही भाग अचानक खचला. सुदैवाने यावेळी या ठिकाणी कुठलेही वाहन नसल्याने कुठलिही दुर्घटना घडली नाही. पाेलीसांनी वेळीच बॅरिगेट लावून वाहनचालकांना सुचित केले. त्यानंतर काही वेळात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा रस्ता दुरुस्त केला. काही दिवसांपूर्वी या रस्ताच्या खालून पाण्याची गळती हाेत असल्याने हा रस्ता खाेदण्यात अाला हाेता. पाण्याच्या लाईनची दुरुस्ती केल्यानंतर पालिकेने एका कंत्राटदाराकडून हा रस्ता पूर्ववत करुन घेतला परंतु कंत्राटदाराने याेग्यरित्या हा रस्ता तयार न केल्यामुळे हा रस्ता खचला. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंत्राटदारावर पालिका कारवाई करणार का ?असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे.