रस्ते खोदाईची कामे संथगतीने
By admin | Published: May 9, 2017 03:21 AM2017-05-09T03:21:38+5:302017-05-09T03:21:38+5:30
तीर्थक्षेत्र आळंदीत जणू काही रस्ते खोदाईची स्पर्धाच सुरू असल्याचा अनुभव माऊलीभक्तांना येत आहे. शहरातील रस्त्यांची
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव : तीर्थक्षेत्र आळंदीत जणू काही रस्ते खोदाईची स्पर्धाच सुरू असल्याचा अनुभव माऊलीभक्तांना येत आहे. शहरातील रस्त्यांची तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत नव्याने काँक्रिटीकरण करण्याची कामे सुरू आहेत. परंतु ही कामे अतिशय संथ गतीने सुरू असल्याने अलंकापुरीत वाहतुकीचा बोजवारा उडू लागला आहे. अवघ्या सव्वा महिन्यावर आषाढी पायी वारी येऊन ठेपल्याने महिन्याच्या कालावधीत ही कामे पूर्णत्वास येतात की नाही, हाही गंभीर प्रश्न समोर येऊ लागला आहे.
मागील तीन ते चार वर्षांपासून शहराला जोडणाऱ्या वडगाव, मरकळ, चाकण, केळगाव, भोसरी आदी रस्त्यांची फार मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्यांचे नव्याने मजबुतीकरणाचे काम मार्गी लावण्याची मागणी नागरिक सुमारे तीन वर्षांपासून प्रशासनाकडे करत होते.
अखेर या वर्षी प्रशासनाने शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था लक्षात घेऊन तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत रस्त्यांची कामे हाती घेऊन काँक्रिटीकरणास सुरुवात केली आहेत. त्यामुळे नागरिकांची तसेच भाविकांची अनेक वर्षांपासूनची रस्ते दुरुस्तीची प्रतीक्षा पूर्ण होत आहे.
चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गाकडून वडगावमार्गे चऱ्होली खुर्द हद्दीतून शहराला जोडणाऱ्या दीड किमी अंतराच्या दुहेरी रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र काही ठिकाणी या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही.
तर चाकण बाजूकडून केळगावमार्गे सुरू असलेले काम गेल्या आठ दिवसांपासून ‘जैसे थे’ अवस्थेत आहे. त्यातच मरकळ बाजूने शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांचे काम हाती घेतल्याने मागील अर्धवट अवस्थेत राहिलेल्या कामांना दुरुस्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरातील बहुतांशी सर्वच रस्त्यांची खोदाई करून कामे संथ गतीने सुरू आहेत. परिणामी प्रवासादरम्यान वाहनांना अडथळा निर्माण होऊन विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.(वार्ताहर)