पालिकेकडून रस्ते खोदाई झालीच नाही!
By admin | Published: May 10, 2015 05:10 AM2015-05-10T05:10:32+5:302015-05-10T05:10:32+5:30
विधी महाविद्यालय रस्ता परिसरातील अशोक पथ येथे शुक्रवारी (दि. ८) भरदिवसा महावितरणकडून खोदाई करून केबल टाकली असतानाही
पुणे : विधी महाविद्यालय रस्ता परिसरातील अशोक पथ येथे शुक्रवारी (दि. ८) भरदिवसा महावितरणकडून खोदाई करून केबल टाकली असतानाही, त्या ठिकाणी खोदाईच झाली नसल्याचा धक्कादायक खुलासा महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याने (जेई) वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केला आहे. त्यामुळे या अभियंत्याने नेमकी कशाची पाहणी केली आणि ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा अट्टहास का केला जात आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरात गेल्या काही महिन्यांत खासगी केबल कंपन्या, महावितरण, बीएसएनएल, तसेच एमएनजीएल कडून बेसुमार रस्ते खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात
जणू काही रस्ते खोदाईची स्पर्धाच
सुरू असल्याचे चित्र आहे. या
प्रकाराची गंभीर दखल घेत
मागील महिन्यात महापौरासंह, स्थायी समिती अध्यक्ष, शहराचे
खासदार, सभागृह नेते, महापालिका आयुक्तांनी स्वतंत्र बैठका घेऊन १ मेनंतर पाणीपुरवठा आणि ड्रेनेज वगळता कोणत्याही प्रकारची खोदाई शहरात करण्यात येणार नसल्याचे आदेश दिले. त्यानुसार, महापालिका आयुक्तांनीही पथ विभागास हे आदेश दिले आहेत. हे आदेश देऊन एका आठवड्याचा कालावधीही उलटला नसतानाच अशोक पथ येथे महावितरणकडून शुक्रवारी दिवसभर खोदाई सुरू होती. या वेळी काही कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांनी आपल्यास याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री उशिरा पथ विभागाकडून एका कनिष्ठ अभियंत्यास या प्रकाराची माहिती घेण्याच्या सूचना कार्यकारी अभियंते संतोष तांदळे यांनी दिल्या. त्या नंतर या कनिष्ठ अभियंत्याने संबंधित जागेची पाहणी करून धक्कादायक खुलासा वरिष्ठांकडे केला आहे.
या कामास परवानगी देण्यात आली असून, हे काम ३0 एप्रिलपूर्वीच करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी काहीच नसल्याची माहिती आपल्याला दिली असल्याचे तांदळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.