घाट नव्हे खड्ड्यांचा रस्ता...!; दोन महिने सिंहगड रस्ता बंद ठेऊनही अपेक्षित काम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 05:00 PM2018-01-12T17:00:58+5:302018-01-12T17:06:41+5:30
पुण्याचे वैभव व देश-विदेशातील पर्याटकांचे आकर्षण असलेल्या सिंहगड घाट रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. एक ते दीड किलो मिटरचा रस्ता सोडल्यास बहुतेक संपूर्ण रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून, डांबर निघून गेल्याने रस्ता निसरडा झाला आहे.
पुणे : पुण्याचे वैभव व देश-विदेशातील पर्याटकांचे आकर्षण असलेल्या सिंहगड घाट रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सध्या पुणेकरांसह राज्यातील विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहलीसाठी सिंहगडावर येत आहेत. परंतु एक ते दीड किलो मिटरचा रस्ता सोडल्यास बहुतेक संपूर्ण रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून, डांबर निघून गेल्याने रस्ता निसरडा झाला आहे. यामुळे सिंहगडावर दररोज जाणारे शेकडो पर्यटक जीव मुठीत घेऊनच प्रवास करत असल्याचे लोकमत पाहणीमध्ये निदर्शनास आले.
जून महिन्या सिंहगड घाट रस्त्यांवर मोठी दरड कोसळल्याने शेकडो पर्यटक गडावर अडकून पडले होते. या रस्त्यांवरील बहुतेक ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असल्याने नंतर तब्बल दोन महिने सिंहगड घाट रस्ता पर्याटकांसाठी बंद ठेवण्यात आला. या दरम्यान शासनाने दीड कोटी रुपयांची तरतुद करून दरड प्रतिबंधक भागात सुरक्षा जाळ्या बसविण्याचे आदेश दिले. त्यानुसार काही भागात दरड प्रतिबंधक जाळ्या बसविण्यात आल्या असून, काही ठिकाणी जाळ्या लावून दगडाचे सुरक्षा कठडे करण्यात आले आहे. परंतु दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल दोन महिने सिंहगड रस्ता बंद ठेऊन देखील अपेक्षित काम मात्र करण्यात आलेले नाही. जून महिन्यात दरड कोसळलेल्या भागातील तुडलेला दुरक्षा कठडादेखील अद्याप दुरुस्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे गर्दीच्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
सुट्टी आणि सिंहगड हे जणू समीकरणच बनले आहे. त्यात पावसाळा आणि थंडीच्या हंगामात गडावर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. त्यात आता २६ जानेवारी (शुक्रवार) ते रविवार सलग सुट्ट्या आल्याने पर्यटक बोच-या थंडीचा अनुभव घेण्यासाठी गडावर जातात. परंतु सध्या गडावर जाण्या-या रस्त्यांची स्थिती पाहिल्यास हा प्रवास पर्यटकांसाठी खडतर आणि जीवघेणा ठरण्याची शक्यता आहे. पावसामुळे बहुतेक ठिकाणचा डांबरी रस्ता वाहून गेला आहे. तर काही ठिकाणी प्रचंड मोठे खड्डे पडले आहे. यामुळे दुचाकी अथवा मोठी वाहने घेऊन जाणे खरेच मोठे धोक्याचे ठरत आहे. शासनाने यामध्ये लक्ष घालून सिंहगड रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे मत पर्यटकांंनी लोकमतची बोलतांना व्यक्ते केले.
पुन्हा ऐन हंगामात सिंहगड रस्ता राहणार बंद
जून महिन्यात सिंहगड घाट रस्त्यावर दरड कोसळल्याने तब्बल दोन महिने दरड प्रतिबंधक जाळ्या बसविण्यासाठी रस्ता बंद ठेवण्यात आला होता. सुरक्षा कठडे व जाळ्या बसविण्यासाठी शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दीड कोटी रुपयांचा निधी दिला होता. आता रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पुन्हा पाच कोटींचा निधी दिला असून, निविदा, वर्क आॅर्डरचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या आठ-दहा दिवसांत रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात येणार आहे.
- धनंजय देशपांडे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण)