वरंध घाटातील रस्ता अवजड वाहनांसाठी तीन महिने बंद; रायगड जिल्हा प्रशासनाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 08:38 PM2023-07-01T20:38:53+5:302023-07-01T20:41:13+5:30
सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. वरंध घाटातील रस्त्यावर दरडी पडत आहेत...
भोर (पुणे) : पावसामुळे दरड पडत असून, महाडमार्गे वरंध घाटातून भोरला येणे धोकादायक झाले आहे. यामुळे १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत तीन महिने रायगड प्रशासनाने सुरक्षिततेच्या कारणास्तव महाड - भोर रस्ता अवजड वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला असून, सूचना फलक लावण्यात आले आहेत.
सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. वरंध घाटातील रस्त्यावर दरडी पडत आहेत. यामुळे रस्त्यावरील वाहतूक धोकादायक असल्यामुळे जिल्हा वाहतूक शाखा रायगड अलिबाग यांनी महाड औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशन यांना पत्र दिले आहे. वरंध घाट रस्ता जिल्हाधिकारी रायगड यांच्या कार्यालयाकडून १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळविण्याचे नियोजन करावयास सांगितले आहे. याबाबत सूचना फलक, महाड हद्दीतील राजेवाडी, ता. महाड येथे लावण्यात आले आहे.
भोर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भोर तालुक्यात भोर-महाड रस्त्यावरील डोंगरातून पाण्याचे धबधबे बाहेर पडत आहेत. यामुळे पर्यटक घाट माथ्यावर आणि घाटात येऊ लागले आहेत. भोर - महाड रस्ताही नवीन झाला आहे. यामुळे वाहनांची वर्दळ वाढली आहे.
दरम्यान, भोर येथून महाडला मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे मागील वर्षी भोर प्रशासनाकडून भोर - महाड रस्ता सुरक्षिततेच्या कारणास्तव तीन महिने बंद ठेवला होता. यावर्षी रस्ता आणि रस्त्यावरील मोऱ्यांची कामे झाली असून, वाहतुकीस रस्ता योग्य आहे. थोड्या फार प्रमाणात दरडी, झाडे पडत आहेत. भोर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना अद्याप दिलेल्या नाहीत. मात्र महाड हद्दीतील वाहतूक बंद केल्याने भोर येथून अवजड वाहनांना महाडला जाता येणार नाही आणि जाणाऱ्या अवजड वाहनांची अडचण होणार आहे.