Pune: बनेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग खचला, रस्ता तात्पुरता बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 09:03 PM2023-07-26T21:03:35+5:302023-07-26T21:06:45+5:30
नसरापूर ( पुणे ) : येथील नसरापूर बाजारपेठेतून बनेश्वर मंदिराकडे (ता. भोर) जाणारा रस्ता आज दुपारी पाच नंतर खचल्याने ताबडतोब प्रशासनाच्यावतीने ...
नसरापूर (पुणे) : येथील नसरापूर बाजारपेठेतून बनेश्वर मंदिराकडे (ता. भोर) जाणारा रस्ता आज दुपारी पाच नंतर खचल्याने ताबडतोब प्रशासनाच्यावतीने वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम शाखा अभियंता, मंडलाधिकारी आणि नसरापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी घटना स्थळी जाऊन पुढील धोका ओळखून रस्ता वाहतुकीस तात्पुरता बंद केला आहे.
बनेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता शिवगंगा नदीच्या पात्रातील वाहत्या पाण्यामुळे तळातून माती निसटत चालली असावी त्यामुळे रस्ता धोकादायक होण्याची प्राथमिक शक्यता अन् भुस्खलन होण्याची शक्यता यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून नसरापूर ग्रामपंचायतीला तोंडी कल्पना दिली असून या धोकादायक रस्त्याबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असल्याचे या उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी शाखा अभियंता इक्बाल शेख, मंडलाधिकारी प्रदीप जावळे, माजी वरीष्ठ पोलीस अधिकारी यशवंत कदम, ज्ञानेश्वर झोरे,संदीप कांबळे,नसरापूर ग्रामपंचायतीचे सदस्य सुधीर वाल्हेकर, नामदेव चव्हाण,ग्रामसेवक विजयकुमार कुलकर्णी, विजय गयावळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
बनेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता धोकादायक बनल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरता बंद ठेवण्यात आला असून त्याभोवती बांबूचे सुरक्षा कडे उभारण्यात आले आहे. त्यासाठी रस्ता बंद असल्याबाबत सूचना बनेश्र्वर चौकात ग्रामपंचायतीच्या वतीने फलक लावण्यात आहे.
भोर तालुक्यातील नसरापूर येथील श्री क्षेत्र बनेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता शिवगंगा नदीच्या पात्रालगत आहे. हा धोकादायक रस्ता नदीपात्रालगत असून नदीपात्रापासून सुमारे दीडशे फूट पेक्षा अधिक उंचीवर आहे. त्यामुळे या मातीच्या धशीच्या डाव्या बाजूस खोल दरी असून रस्त्याच्या उजव्या बाजूस खासगी शेत जमिनी आहेत.या रस्त्यालगत वाहनांना अपघात होऊ नये याकरीता जिल्हा परिषदेकडून संरक्षक भिंत उभारलेली आहे. अनेक वर्षे रस्ता धोकादायक असताना आजतागायत येथू नबनेश्वर, केळवडेकडे जाणारा रस्ता अव्याहतपणे सुरू आहे.