रस्ते दुरुस्तीपायी पाच वर्षात १०० कोटी खड्ड्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 07:00 AM2019-08-18T07:00:00+5:302019-08-18T07:00:06+5:30
खड्डे पडण्याचे प्रमाण यंदा वाढले असून नविन रस्त्यांवर ही समस्या अधिक जाणवत असल्याचे चित्र आहे.
पुणे : पाऊस, खोदाई, खड्डे यासह अन्य कारणांमुळे बिघडलेले रस्ते पुर्ववत करण्यासाठी गेल्या पाच वर्षात तब्बल १०० कोटींपेक्षा अधिक खर्च झाला आहे. गेल्या पाच वर्षात खड्डे दुरुस्तीवर जवळपास ४० कोटींचा तर विविध कारणांनी खोदले गेलेले रस्ते पुर्ववत करण्यासाठी ५५ कोटींचा खर्च गेल्या तीन वर्षात झाला आहे. खड्डे पडण्याचे प्रमाण यंदा वाढले असून नविन रस्त्यांवर ही समस्या अधिक जाणवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कामाचा दर्जा तपासण्याची पालिकेची यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे समोर आले आहे.
जलवाहिन्या टाकणे, टेलिफोन, विद्यूत केबल्स, ऑप्टिकल फायबर केबल, पदपथामधून लाईन्स व डक्ट करणे, गॅस वाहिन्या टाकणे, ड्रेनेज लाईन बदलणे, रस्ता ओलांडण्यासाठी चौकांलगत डक्ट व चॅनल तयार करणे आदी कारणास्तव सतत रस्ते खोदाई करावी लागते. पालिकेच्या मुख्य सभेने अर्बन स्ट्रीट डिझाईन गाईड लाईन्स (युएसडीजी) हे धोरण मंजूर केलेले आहे. त्यामध्ये रस्त्याची बांधणी करताना रस्त्यावरील सर्व युटिलिटी लाईन्स टाकण्यासाठी स्वतंत्र डक्ट्स (कॅरेजवे सोडून) ठेवण्याबाबत मार्गदर्शक तत्वे नमूद केली. परंतू, त्याची अंमलबजावणी करण्यात प्रशासन कमी पडत आहे.
रस्त्यांवर खड्डे पडल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीमध्ये रस्त्यांच्या अडचणींसंदर्भात जवळपास सहा हजार नागरिकांनी आॅनलाईन तक्रारी केल्या आहेत. यामध्ये खड्ड्यांसह रस्त्यावरील राडारोडा, चेंबर दुरुस्ती, पदपथ दुरुस्ती अशा कामांसाठीच्या तक्रारींचाही समावेश आहे. क्षेत्रिय कार्यालयस्तरावर बारा मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीचे काम खात्यामार्फत करण्यात येते. रस्ते बनविताना डांबर, सिमेंट, खडी, वाळू आणि विटा यांचा दर्जा अभियंते, अधिकारी आणि थर्ड पार्टी संस्थेकडूनही तपासण्यात येतो. तरीही रस्त्यावर खड्डे पडतात.
ठेकेदारामार्फत करण्यात येणाऱ्या कामांची तपासणी ईआयएल या त्रयस्थ संस्थेमार्फत केली जाते. रस्ते तयार केल्यानंतर डिफेक्ट लायबिलीटी पिरीयड मध्ये खड्डे पडल्यास संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याची दुरुस्ती करुन घेण्याची अट आहे. परंतू, या कालावधीत खड्डेच पडले नसल्याचा पालिकेचा दावा आहे.
====
परिमंडलनिहाय खड्ड्यांवरील खर्चाची आकडेवारी
वर्ष परिमंडल एक दोन तीन चार पाच
२०१५-१६ ५०.३५ १८.४३ ३२.८६ १३.६६ २८.९४
२०१६-१७ ३६.७३ ४१.८९ ३२.४६ १९.२४ ५१.१२
२०१७-१८ २१.१४ २९.९२ २४.४८ २६.१२ ४६.२६
२०१८-१९ ५७.३२ ३६.५६ २२.२७ ४२.९० ५५.९१
२०१९-२० ०.०० ०.०० ०.०० ०.०० ०.००
एकूण १६५.५४ १२६.८ ११२.०७ १०१.९२ १८२.२३
=====
पथ विभागाकडून खड्ड्यांवर झालेला खर्च
वर्ष रक्कम
२०१६-१७ ८३ लाख ९३ हजार ३९०
२०१७-१८ ९३ लाख ३४ हजार ४२६
२०१८-१९ १ कोटी १२ लाख ४८ हजार
२०१९-२० ५२ लाख २० हजार ०५०