भरपावसाळ्यात शहरात रस्तेखोदाई
By admin | Published: June 29, 2017 03:48 AM2017-06-29T03:48:54+5:302017-06-29T03:48:54+5:30
महावितरण असो की गॅस पाईपलाईन, कितीही अत्यावश्यक सेवा असल्यानंतर पावसाळ्यामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या रस्तेखोदाईला
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महावितरण असो की गॅस पाईपलाईन, कितीही अत्यावश्यक सेवा असल्यानंतर पावसाळ्यामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या रस्तेखोदाईला परवानगी न देण्याचे महापालिकेचे स्वत:चे धोरण आहे. परंतु, या धोरणालाच हरताळ फासून महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागांत सिमेंटचे रस्ते व स्टॉर्म वॉटर ड्रेनेजच्या कामासाठी भरपावसाळ्यात सर्रास रस्तेखोदाई सुरू आहे. पावसामुळे या खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठून मोठा अपघात होण्याची भीती आहे.
शहरात गेल्या काही वर्षांत मोबाईल तसेच शासकीय कंपन्यांकडून भूमिगत सेवावाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, ऐन पावसाळ्यात या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने शहरातील रस्त्यांची
मोठी दुरवस्था होते. तसेच पावसाळ्यापूर्वी खोदकाम केलेल्या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास अपघातदेखील होण्याची शक्यता असते. यामुळे बेसुमार खोदकामांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने दोन वर्षांपूर्वी खास खोदाई धोरण तयार केलेले आहे. यानुसार, पावसाळ्यापूर्वी रस्तेदुरुस्ती आवश्यक असल्याने ३० एप्रिलपर्यंतच
खोदकाम परवानगी दिली जाते. त्यानंतर संपूर्ण मे महिन्यामध्ये दुरुस्ती केली जाते. त्यानंतर केवळ एखादे अत्यावश्यक काम आले, तरच खोदकामास मान्यता देण्याचे विशेष अधिकार आहेत.
महापालिकेच्या वतीने यंदा शहरात विविध सेवा पुरविण्यासाठी खासगी कंपन्यांना सुमारे २५० किलोमीटरच लांबीच्या रस्तेखोदाईला मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी अद्यापही ७० ते ८० किलोमीटरचे खोदलेले रस्ते पूर्ववत झाले नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या पथ विभागाच्या वतीने अद्यापही हे रस्ते पूर्ववत करण्याचे काम सुरूच आहे.