वरंघ घाटातील रस्ता ८० दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:10 AM2021-02-07T04:10:01+5:302021-02-07T04:10:01+5:30
भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटातील महाड तालुक्याच्या हद्दीतील एका तीव्र वळणावरील संरक्षक भिंत १३ ॲागस्ट रोजी अतिवृष्टीमुळे कोसळली होती. यामुळे ...
भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटातील महाड तालुक्याच्या हद्दीतील एका तीव्र वळणावरील संरक्षक भिंत १३ ॲागस्ट रोजी अतिवृष्टीमुळे कोसळली होती. यामुळे मागील सहा महिन्यांपासून मोठ्या गाड्याची वाहतूक घाटातून बंद होती. लहान गाड्याच सुरू होत्या. हा रस्ता व संरक्षणक भिंत दुरुस्तीसाठी निधीची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी ५ कोटी ४० लाख ५५ हजार रुपयांचा निधी महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मंजूर झाला आहे. कामाच्या अंदाजपत्रकाला तांत्रिक मान्यता होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांनी सांगितले.
दिनांक १० फेब्रुवारीपासून ते ३० एप्रिल या ८० दिवसांच्या कालावधीत रस्त्यावरील वाहतूक पूर्णत: बंद करून बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटातून महाडला जाण्यास कोणत्याही प्रकारची वाहने घेऊन येऊ नये, अन्यथा वाहने घाटात अडकून राहातील. या शिवाय दुचाकी वाहनेही घाटाने बंद करण्यात आल्याचे आवाहन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांनी केले आहे.
--
चौकट
--
वरंध घाटातील सदर रस्त्याचे काम करायची जागा अतिदुर्गम आहे. या ठिकाणी एका खाली एक अशी तीन मोठी आणि तीव्र उताराची वळणे असून जागा अत्यंत अरुंद आहे. संरक्षक भिंतीचे काम करताना खोलवर खोदाई करावी लागणार आहे. तसेच कामासाठी लागणारी यंत्रे पोकलेन, जेसीपी, डंपर, मिक्सर इत्यादीसाठी लागणारी जागा व बांधकाम साहित्य यामध्ये खडी, वाळू, सिमेंट, सेंट्रींगसाठी लोखंडी अँगल प्लेट्स व पाणी साठवण्यासाठी लागणारी जागा अपुरी आहे, जुन्या दगडाच्या कॉंक्रीटच्या भिंती पाडताना दगड खालच्या रस्त्यावर पडण्याची शक्यता आहे. यामुळे अपघात होऊ शकतो.