रस्तारुंदीकरणाचे काम संथगतीने
By admin | Published: March 21, 2017 05:26 AM2017-03-21T05:26:46+5:302017-03-21T05:26:46+5:30
पुणे-नगर महामार्गाच्या रस्तारुंदीकरणाच्या कामामध्ये संथपणा असल्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना प्रवास करताना
वाघोली : पुणे-नगर महामार्गाच्या रस्तारुंदीकरणाच्या कामामध्ये संथपणा असल्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना प्रवास करताना धोका पत्करावा लागत आहे. रुंद करण्यात आलेल्या रस्त्याचे डांबरीकरण केले नसल्याने वाहनांच्या अपघातात वाढ झाली असून, वाहतूककोंडीमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
वाघोली येथे पुणे-नगर महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण येत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम जागतिक बँक प्रकल्प विभागाकडून रस्तारुंदीकरणाचे काम दोन महिन्यांपूर्वी सुरूकरण्यात आले. रस्तारुंदीकरणाच्या एका बाजूचे सलग काम करण्याऐवजी जागा मिळेल तिथे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामध्ये अतिशय संथपणा आल्यामुळे महामार्गालगतचे व्यावसायिक, रुग्ण, शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, वाहनधारक व नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठा धोका पत्करावा लागत आहे. रुंदीकरणादरम्यान रस्त्याच्या कडेला खोदकाम करून टाकलेल्या खडीमुळे छोटी-मोठी वाहने फसण्याचे, घसरण्याचे प्रकार वाढल्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
नगर महामार्गावर वाहनांची सततची वर्दळ असल्यामुळे नेहमीच नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागतो. काही प्रमाणात का होईना कोंडी कमी व्हावी, या उद्देशाने रस्तारुंदीकरणाचे काम केले जात असले, तरी उलट काम संथपणे चालू असल्यामुळे व चालू असलेल्या कामावरील वाहनांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, नागरिकांना जीव धोक्यात
घालून वाहन चालवावे
लागत आहे.
रुंद करण्यात आलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी शिवछत्रपती प्रतिष्ठानसह ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.