रस्त्याचे काम अजूनही रखडले
By Admin | Published: December 23, 2016 12:59 AM2016-12-23T00:59:28+5:302016-12-23T00:59:28+5:30
सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरातील नित्यानंद भवन भागातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम नगरसेवकांकडून हाती
पुणे : सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरातील नित्यानंद भवन भागातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम नगरसेवकांकडून हाती घेण्यात आले खरे; मात्र हे काम पूर्णत्वास न नेता केवळ राडारोडा दूर करून ‘जैसे थे’ स्थितीतच ठेवण्यात आले आहे. या रस्त्यावर खोदकाम करताना पाण्याच्या पाइपलाइनला धक्का लागल्याने पाणी साचून चिखलाची स्थिती निर्माण झाल्याने शाळकरी मुलांसह नागरिकांना यातून मुश्किलीने मार्ग काढून जावे लागत आहे. तसेच चारचाकी वाहन आत आणणे अशक्य झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना झोळीत घालून हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ येत आहे. चांगल्या रस्त्याची अशी दुर्दशा केल्यामुळे नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला असून, नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
जवळपास महिनाभरापूर्वी या भागातील रस्त्याच्या खोदकामाला सुरुवात करण्यात आली, हे काम सुरू करताना या कामाला किती कालावधी लागेल? त्याचे नियोजन कसे करण्यात आले आहे, याची कोणतीच माहिती या परिसरातील नागरिकांना देण्यात आली नाही.
अचानक काम सुरू करण्यात आल्यामुळे या भागातील पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणे दुरापास्त झाले आहे. चारचाकी वाहन या भागात आणणेच अवघड झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना अत्यवस्थ वाटू लागल्यास त्यांना झोळीत घालून नेण्याची वेळ कुटुंबीयांवर येत आहे. यातच रस्त्याच्या खोदाईचे काम करताना अंतर्गत पाइपलाइनला धक्का लागल्याने पाण्याचे लिकेज सुरू झाले, रस्त्यावर पाणी साचल्याने चिखल साचला आहे. यातच नित्यानंदजवळील तीन बंगल्यांची मिळून असलेली अंतर्गत विजेची केबल तुटल्याने रहिवाशांना स्वत: २००० रुपयांची केबल आणण्याचा भुर्दंड पडला. (वार्ताहर)