रस्त्यांची कामे अत्यंत कासवगतीने; पुणेकरांनाे, खड्ड्यांतून प्रवास करण्यासाठी व्हा सज्ज!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 05:29 PM2023-06-23T17:29:28+5:302023-06-23T17:29:43+5:30

पावसाळ्यात खड्ड्यांमुळे अपघात घडत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागणार

Road works very slow Pune citizens get ready to travel through potholes | रस्त्यांची कामे अत्यंत कासवगतीने; पुणेकरांनाे, खड्ड्यांतून प्रवास करण्यासाठी व्हा सज्ज!

रस्त्यांची कामे अत्यंत कासवगतीने; पुणेकरांनाे, खड्ड्यांतून प्रवास करण्यासाठी व्हा सज्ज!

googlenewsNext

पुणे: शहरातील रस्त्यांची कामे अत्यंत कासवगतीने सुरू आहेत. जून महिना संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असतानाही पुणे महापालिकेने मंजुरी दिलेल्या १ ते ५ पॅकेजमध्ये १००.७८ पैकी केवळ ४१ किलोमीटर लांबीचे रस्ते आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. पॅकेज १, ४ आणि ५ मधील रस्त्यांच्या कामांना आता सुरुवात झाली आहे. या रस्त्यांची कामे कधी पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित हाेत आहे. त्यामुळे पुणेकरांना यंदाच्या पावसाळ्यात खड्ड्यांतून प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ड्रेनेज आणि जलवाहिनी टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदाई केली होती. त्यावर पॅचवर्कचे काम करण्यात आले होते; पण हे पॅचवर्क रस्त्याशी एकरूप झाले नव्हते. रस्ते खोदाईनंतरच्या वरवरच्या मलमपट्टीमुळे रस्ते उखडले. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे सर्वच रस्त्यांवर पाणी साचून खड्डे पडले होते. अनेक ठिकाणी रस्त्यावर खडी पसरली होती. अनेक अपघात खड्ड्यांमुळे झाले होते. काही जखमींना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले, काही कायमचे जायबंदी झाले होते.

शहरातील चित्र काय?

- समान पाणीपुरवठा, सांडपाणी वाहिनी, विद्युत वाहिनी यासह मोबाइलच्या सेवावाहिनी टाकण्यासाठी गेल्या दोन-अडीच वर्षांत शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात खोदकाम झालेले आहे. खोदकामानंतर व्यवस्थितरीत्या खड्डे न बुजवल्याने अनेक ठिकाणी शहरात रस्ते खचलेले आहेत. रस्त्यांची चाळण झालेली, त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. पालिकेच्या पथविभागाने रस्ते दुरुस्तीचे कामकाज युद्धपातळीवर हाती घेतले होते.
- महापालिकेच्या या कारभाराविरोधात टीका झाल्यानंतर ३०० कोटी रुपये खर्च करून शहरातील सर्व रस्ते चकाचक केले जातील, अशी घोषणा महापालिका प्रशासनाने केली. त्यासाठी सहा पॅकेजमध्ये निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
- पॅकेज नंबर एक, दोन, तीन याच्या निविदा मंजूर करून प्रत्यक्ष कामाचे आदेश देण्यात आले; तर पॅकेज क्रमांक चार आणि पाच हे वादात सापडल्याने ते रद्द करून त्यांची निविदा पुन्हा एकदा मागविलेली होती. त्यानंतर या निविदेला मंजुरी देण्यात आली. पॅकेज नंबर सहा हे नाल्यावरील कन्वर्ट बांधण्यासाठीचे कामही सुरू झाले आहे.

५५ पैकी केवळ ४१ किलोमीटरची कामे :

पॅकेज एक, दोन, तीन मिळून एकूण ५६ किलोमीटरचे रस्ते डांबरीकरण केले जाणार आहेत. त्यासाठी १९३ कोटी ४५ लाख रुपये इतकी किमतीचे निविदा मान्य केलेली आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासून रस्त्यांची कामे सुरू केलेली असली तरी १५ जूनपर्यंत ५५ पैकी केवळ ४१ किलोमीटरच्या रस्त्यांची कामे झाली. उर्वरित ठिकाणची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत.

कामे पूर्ण होणार कधी?

रस्त्यांच्या कामांसाठीच्या पॅकेज चारमध्ये २१.९० किलोमीटर आणि पॅकेज पाचमध्ये २२.३३ किलोमीटर लांबीचे रस्ते आहे. पॅकेज चारमधील निविदेवरून मोठे वाद झाले होते. त्यानंतर तांत्रिक मुद्यांवरून ही निविदा रद्द केली. त्यानंतर पुन्हा ही निविदा काढून ती मान्य करण्यात आली. पॅकेज चारमध्ये पहिल्या टप्प्यात ९ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहे. आता केवळ हांडेवाडी रस्त्याचे काम सुरू केले आहे. केशवनगर, एनआयबीएम चौक, ससाणेनगर, कोंढवा खुर्द, कसबा विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय भागातील रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. पॅकेज पाचमध्ये एकुण ३२ रस्ते असून, त्यामधील ९ रस्त्यांची कामे प्राधान्याने केली जाणार आहेत. त्यामध्ये व्हीआयपी रोड रामवाडी, पाषाण सूस रोड, डेक्कन परिसरातील रस्त्याची कामे केली जाणार आहेत. या दोन्ही पॅकेजमधील रस्त्यांची १ किलोमीटरचीही कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे ही कामे कधी पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अवघ्या ४१ किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण

पुणे महापालिकेने एक ते तीन या पॅकेजमध्ये ५६.५५ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करणार आहे. या रस्त्यांच्या कामांना फेब्रुवारीमध्ये सुरुवात झाली; पण अद्याप पॅकेज दोनमधील २०.८७ किलोमीटर लांबीमधील अवघे १६.९० किलोमीटरचे रस्ते पूर्ण झाले आहेत. पॅकेज तीनमधील रस्त्याची लांबी २७.३८ किलोमीटर आहे. त्यापैकी २३.४१ किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण झाले आहेत. त्यामुळे अवघे ४१ किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण झाले आहेत.

सिमेंट कॉंक्रिटचा केवळ १०० मीटरचा रस्ता पूर्ण 

शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी पुणे महापालिकेने एक ते सहा पॅकेज तयार केले आहे. त्यात पॅकेज एकमध्ये सिमेंट काँक्रीटचे ८.३० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यात अवघा १०० मीटरचा रस्ता पूर्ण झाला आहे. आता बिबवेवाडी मुख्य रस्ता, विश्रांतवाडी चौक, औंध येथे रस्त्यांच्या कामांना सुरुवात झालेली आहे पण हे रस्ते कधी पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.

पुण्यातील रस्ते 

एकूण लांबी - १ हजार ४०० किलोमीटर
बारा मीटरपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते - ४२८ किलोमीटर
बारा मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते - ९७१ किलोमीटर
सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते - २०० किलोमीटर

पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न

रस्त्याची कामे अधिक वेगाने केली जात आहेत. पॅकेज ४ आणि ५च्या कामाची वर्कऑर्डर जून महिन्यात दिली आहे. त्यामुळे ती कामे आता सुरू झाली आहेत. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. - विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

Web Title: Road works very slow Pune citizens get ready to travel through potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.