पालिकेची ५०० वाहने ठरताहेत रोडकिलर
By admin | Published: October 6, 2014 06:32 AM2014-10-06T06:32:42+5:302014-10-06T06:32:42+5:30
शहरातील सर्व नागरिकांच्या पालकत्वाची जबाबदारी शिरावर असलेल्या महापालिकेचीच हॅन्डब्रेक, लाईट, इंडिकेटर बंद असलेली ५०० पेक्षा जास्त वाहने रस्त्यावर धावत आहेत
दीपक जाधव, पुणे
शहरातील सर्व नागरिकांच्या पालकत्वाची जबाबदारी शिरावर असलेल्या महापालिकेचीच हॅन्डब्रेक, लाईट, इंडिकेटर बंद असलेली ५०० पेक्षा जास्त वाहने रस्त्यावर धावत आहेत. बिघाड असलेली ही वाहने बिनदिक्कतपणे शहराच्या रस्त्यावरून धावत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. महापालिकेकडून माहिती अधिकारांतर्गत मिळवलेल्या माहितीतूनच ही बाब स्पष्ट झाली आहे.
महापालिकेच्या कंटेनअर, कचरा गाडी, वॉटर टँकर व इतर वाहनांची धडक बसून निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना शहरामध्ये नियमितपणे घडत आहेत. वाहनांची नीट देखभाल राखली जात नसल्याने या घटना वारंवार घडत असल्याने पालिकेच्या वाहनांची स्थिती कशी आहे. याबाबतची तपशीलवार माहिती लोकहित फाउंडेशनचे अध्यक्ष अजहर खान यांनी मिळविली आहे.
महापालिकेच्या ताफ्यात कचऱ्याच्या ६४ गाड्या, ड्रेनज दुरुस्तीसाठीच्या ३५, डंपर प्लेसर १२४, अॅम्बेसिडर ५८, इंडिका ३८, जेसीबी २८ व इतर अशी १०१७ वाहने आहेत. त्यातील २१७ वाहनांचे हॅन्डब्रेक बंद आहेत; तर २७५ वाहनांचे पार्किंग लाईट, ४०९ वाहनांचे स्पिडो मीटर बंद स्थितीमध्ये आहे. तरीही ही वाहने बिनदिक्कतपणे रस्त्यावरून धावत आहेत. अनेक वाहने बंद स्थितीमध्ये आहेत. त्यातील १२ वाहने केवळ आरटीओचे पासिंग न करण्यात आल्याने बंद आहेत. गिअर बंद, स्टेअरिंग आॅईल लिकेज, हायड्रॉलिक काम, सायलेन्सर, गॅस मारते, टिपींग सिलिंडर लिकेज अशा कारणांसाठी वाहने बंद स्थितीत आहेत.
शहरातील वाहतुकीच्या प्रश्नावर तळमळीने काम करणारे कार्यकर्ते अनंत ढगे याबाबत म्हणाले, ‘‘महापालिकेने वाहनांच्या स्थितीबाबत दिलेली माहिती खूपच भयानक आहे. आरटीओच्या नियमानुसार ही रस्त्यावर आणणे चुकीचे आहे. दर वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये महापालिकेकडून लाखो रुपयांचा निधी वाहन दुरुस्तीच्या खर्चासाठी ठेवला जातो, तो पैसा कुठे गेला. वाहनांची जर इतकी दुरवस्था असेल, तर त्या निधीचा खरंच योग्य वापर झालाय का, असा प्रश्न उभा राहतो.’’