वाहतूक पोलिसांच्या मदतीला रोडिओ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:19 AM2019-01-16T00:19:18+5:302019-01-16T00:19:43+5:30
चाचणीला सुरुवात : वाहतुकीवर राहणार रोबोटची नजर
पुणे : वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणे, सिग्नल लागल्यानंतर वाहनांना थांबण्याचा इशारा करणे आणि झेब्रा क्रॉसिंग पाळण्यास सांगणे आदी बाबींसाठी आता वाहतूक पोलिसांना रोडिओ हा रोबोट मदत करणार आहे.
शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत चालण्यासाठी वाहतूक शाखेकडून विविध प्रयोग करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रोबोटचा प्रयोग राबविण्यात येत असून त्याची मंगळवारी वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळ चाचणी घेण्यात आली. शहरातील महत्त्वाच्या चौकात हा रोबोट टप्प्याटप्प्याने ठेवण्यात येणार आहे. एसपी रोबोटिक्स मेकर लॅबच्या ६ विद्यार्थ्यांनी हा रोबोट तयार केला आहे. बॅटरीवर चालणारा हा रोबोट काही तास चार्च केल्यास दिवसभर विविध मार्गांवर वाहतूक नियमनाचे काम करू शकतो. भविष्यात त्याला सीसीटीव्हीदेखील बसविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे भंग करणारे त्याद्वारे टिपता येतील, अशी माहिती एसपी रोबोटिक्स मेकरच्या खराडी लॅबचे प्रमुख संदीप गौतम यांनी दिली.
रोबोट चाचणीचे उद्घाटन पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या हस्ते केले. यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते उपस्थित होत्या. आयुक्त म्हणाले, की डिजिटल बाबींचा वापर करण्यावर पुणे पोलिसांचा नेहमीच भर राहिला आहे. सध्या शहरातील काही रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर रोबोटच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रण करण्यास मदत होणार आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून इतर रस्त्यावरदेखील रोबोटची व्यवस्था केली जाणार आहे, तर उपायुक्त सातपुते म्हणाल्या, की येत्या काही दिवसांत शहरातील प्रत्येक मोठ्या चौकात रोबोचा डेमो दाखविणार आहे. जनजागृती आणि सिग्नलवर थांबण्याचा इशारा करणे ही दोन प्रमुख कामे हा रोबोट करेल. त्याची मदत वाढविण्याच्या दृष्टीने त्यात अजून बदल करता येतील.
राज्यातील पहिलाच प्रयोग
चेन्नईतदेखील अशा प्रकारचा रोबो तयार केला होता. त्याचा पोलिसांना मोठा फायदा होत आहे. त्यानंतर पुण्यात हा प्रयोग करण्यात येत आहे. राज्यातील वाहतूक पोलीस राबवित असलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. प्रत्यक्ष चाचणीनंतर शहरात अशा प्रकारे रोबोटच्या माध्यमातून नियमन शक्य आहे का? हे तपासले जाईल, असे गौतम यांनी सांगितले.
६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांची कमाल
एसपी रोबोटिक्स मेकरच्या ठाणे शाखेतील काहींचे मार्गदर्शन घेऊन पुण्यातील विद्यार्थ्यांनी हा रोबोट तयार केला आहे. त्यासाठी सुमारे ३ लाख रुपयांचा खर्च आला आहे. त्यात बॅटरी बसविण्यात आली आहे. पूर्ण चार्ज झाल्यास ती दिवसभर चालू शकते.
रचित जैन, शौर्य सेन, पार्थ कुलकर्णी, विनायक कृष्ण, श्रेतेन पांडे, आदिक कांचनकर आदी विद्यार्थ्यांनी हा रोबोट तयार केला आहे. राहुल माथूर आणि संदीप गौतम यांनी मार्गदर्शन केले.
वाहतूक पोलिसांना प्रत्येक वेळी रस्त्यावर काम करीत असताना ऊन, वारा, पाऊस याचा सामना करावा लागतो. तसेच त्यांना कामाची ठराविक वेळ दिलेली असते. मात्र रोबोटवर या सर्वांचा काही परिणाम होणार नाही. त्यामुळे तो अधिक फायदेशीर ठरेल, असा विश्वास पार्थ कुलकर्णी या विद्यार्थ्याने व्यक्त केला.