रोडकिलरला आरटीओचा दणका
By admin | Published: October 9, 2014 05:20 AM2014-10-09T05:20:39+5:302014-10-09T05:20:39+5:30
महापालिकेच्या ताफ्यातील हॅन्डब्रेक, इंडिकेटर, लाइट नसलेली ५०० पेक्षा जास्त रोडकिलर वाहने रस्त्यावर धावत असल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले
पुणे : महापालिकेच्या ताफ्यातील हॅन्डब्रेक, इंडिकेटर, लाइट नसलेली ५०० पेक्षा जास्त रोडकिलर वाहने रस्त्यावर धावत असल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वायूवेग भरारी पथकामार्फत २०० वाहनांची तपासणी करून नादुरुस्त आढळून आलेल्या ४५ वाहनांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.
महापालिकेच्या कंटनेर, कचरा गाडी, वॉटर टँकर व इतर वाहनांची धडक बसून निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना शहरात नियमितपणे घडत आहेत. या पार्श्वभुमीवर पालिकेच्या सर्व वाहनांची स्थिती कशी आहे, याबाबतची तपशीलवार माहिती अजहर खान यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळविली. त्यातून धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे. ‘लोकमत’ने त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करताच आरटीओकडून बुधवारपासून धडक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
आरटीओकडून दरवर्षी वाहनांची तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र घेणे वाहनमालकांवर बंधनकारक आहे. त्या वाहनांची कधीही अचानक तपासणी करण्याचे अधिकार मोटार वाहन कायद्यानुसार वाहन निरीक्षकांना आहेत. आरटीओच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या २०० वाहनांची तपासणी केली, त्यामध्ये ४५ वाहनांमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात
आली.
वाहनांमध्ये जास्त प्रमाणात त्रुटी आढळून आल्यास संबंधित वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र रद्द
केले जाते. त्यानुुसार दोन वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र रद्द केले गेले. कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून
आल्याने एक वाहन जप्त करण्यात आले. उर्वरित वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
आरटीओने महापालिकेच्या वाहनाचालकांकडून ८६ हजार रूपयांचा दंड वसूल केला.
याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले की, ‘महापालिकेच्या वाहनांची उपप्रादेशिक अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत तपासणी करण्यात येत आहे. महापालिकेच्या व्हेईकल डेपो व्यवस्थापकांना याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. मोटार वाहन कायदा १९८८ अन्वये वाहनांची स्थिती योग्य राखण्याची जबाबदारी वाहनचालक व संबंधित वाहनमालकांवर आहे.’ (प्रतिनिधी)