भिगवण परिसरात रोडरोमिआेंंचा पुन्हा त्रास
By admin | Published: October 2, 2016 05:33 AM2016-10-02T05:33:32+5:302016-10-02T05:33:32+5:30
भिगवण येथील हायस्कूल आणि महाविद्यालय परिसरात रोडरोमिओंनी आपले डोके वर काढण्यास सुरवात केल्याचे चित्र आहे. शुक्रवारी रात्री भिगवण पोलीस ठाण्यात
भिगवण : भिगवण येथील हायस्कूल आणि महाविद्यालय परिसरात रोडरोमिओंनी आपले डोके वर काढण्यास सुरवात केल्याचे चित्र आहे. शुक्रवारी रात्री भिगवण पोलीस ठाण्यात आलेल्या प्रकरणातून याचाच प्रत्यय आला. भिगवण पोलिसांनी लागलीच याच्याकडे लक्ष दिल्यास महिला आणि मुलींच्या छेडछाडीला आळा बसणार आहे. भिगवण रोडरोमिओ तसेच कॉलेज परिसरात वेगाने गाड्या चालविणाऱ्या दुचाकीस्वारांमुळे संवेदनशील बनलेले आहे. याला योग्य तो पायबंद घालून हा प्रश्न काहीअंशी निकालात काढण्यात तत्कालीन पोलीस अधिकारी चंद्रशेखर यादव यांना यश मिळाले होते. त्यांनी महिला आणि मुलींना विश्वासात घेऊन बोलते केले होते. चर्चेतून त्यावर मार्ग काढला होता. त्यामुळे छेडछाड तसेच पाठलाग करण्याचे प्रकार थांबले होते. त्यातच यादव यांची बदली झाल्याने पुन्हा हे प्रकार सुरू झाले आहेत. रोडरोमिओंनी सुटकेचा नि:श्वास सोडून पुन्हा आपल्या कारवाया सुरू केल्याचे दिसून येत आहे. याविषयी नवनियुक्त सहायक पोलीस निरीक्षक नीलकंठ राठोड यांच्याशी संपर्क साधला असता अशा रोडरोमिओंविरोधात कारवाई करणार असल्याचे सांगितले.
(वार्ताहर)