पहिल्याच पावसात बावधनमधील रस्त्यांची झाली दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:08 AM2021-07-18T04:08:42+5:302021-07-18T04:08:42+5:30
पुणे : उघडीप दिलेल्या माॅन्सूनने पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केली आहे. पडलेल्या पावसामुळे बावधनमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली ...
पुणे : उघडीप दिलेल्या माॅन्सूनने पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केली आहे. पडलेल्या पावसामुळे बावधनमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. सर्वत्र खड्डेच खड्डे पडले असून काही नवीन तयार केलेले रस्ते वाहून गेल्याचे समोर आले आहे. दरम्यान, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना या मार्गांचा वापर करताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
परिसरातील रस्ते दुरुस्तीसाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. परंतु रस्त्यांच्या निकृष्ट कामामुळे पहिल्याच पावसात खड्डे पडतात. त्यामुळे याला जबाबदार कोण? असा प्रश्न सामान्य बावधनकर विचारत आहेत. काही ठिकाणी तर ऐन पावसाळ्यात रस्त्यांची कामे सुरू असून त्याच्या राडारोड्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. रिलायन्स रस्त्यावरील 'अडीसा कंपनी' समोर रस्त्याचा एक भाग पूर्णपणे खचला असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. तर रामनगर भागातील 'उच्च ऊर्जा सामग्री प्रयोगशाळा' (एचईएमआरएल) या सरकारी संस्थेसमोरील चौकात मोठा खड्डा पडून त्यात पाणी साचल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बावधन बुद्रुकमध्ये वैकुंठ स्मशानभूमीजवळ दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने कचरा आणि सांडपाणी साचले आहे. त्यामुळे या दुर्गंधी आणि गैरसोयीतून रोगराई पसरण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. दररोज सकाळी व्यायामासाठी जाणाऱ्या तरुणाई व विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा त्रास होत आहे. सकाळी चालताना याचा अंदाज येत नाही. त्यामुळे काही लोक गुरफटून पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या डागडुजीबरोबरच निकृष्ट कामाचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
दरम्यान, शहरातील पुढारी व स्थानिक लोकप्रतिनिधी सातत्याने परिसरातील विकासाचा दावा करतात. परंतु प्रत्यक्षात बावधनकरांच्या पदरी निराशाच आहे. त्यामुळे आता मूलभूत सुविधांसाठी कुणाकडे दाद मागायची, या भागातील रस्त्यांकडे कोण लक्ष देणार? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
१७ बावधन