रस्त्यांचे पालटले नशीब

By admin | Published: January 22, 2016 01:26 AM2016-01-22T01:26:02+5:302016-01-22T01:26:02+5:30

लोणावळा शहराच्या तुंगार्ली गावालगत राहूनही रस्ते या मूलभूत समस्येपासून वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या पांगळोली,

Roads change luck | रस्त्यांचे पालटले नशीब

रस्त्यांचे पालटले नशीब

Next

लोणावळा : लोणावळा शहराच्या तुंगार्ली गावालगत राहूनही रस्ते या मूलभूत समस्येपासून वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या पांगळोली, धनगरवस्ती व ठाकरवाडी या वस्त्यांचे रातोरात नशीब बदलले असून, या भागातील सुमारे दोन किमी अंतराच्या वन विभागाच्या हद्दीतील रस्ता चकाचक झाला आहे. निमित्त आहे, ते या वस्त्यांच्या डोक्यावर म्हणजेच डोंगरमाथ्यावरील एका हॉटेलमध्ये मुख्यमंत्री व काही मोजके मंत्री यांच्या चिंतन शिबिराचे.
स्वमालकीचे धरण असलेली लोणावळा ही महाराष्ट्रातील एकमेव नगर परिषद आहे. तुंगार्ली गावाच्या डोंगरावर नगर परिषदेचे हे धरण आहे. धरण परिसरात पांगळोली ही कातकरी व ठाकरवस्ती, बाजूला धनगरवस्ती व पुढे राजमाची किल्ल्याकडे जाणारा शेकडो वर्षांपासून पायवाटवजा रस्ता आहे. वन विभागाच्या हद्दीतून असल्याने हा रस्ता बनविण्यासाठी वन विभाग परवानगी देत नसल्याने आजपर्यंत या रस्त्यावर कधीच डांबर पडले नाही. फूटभर पाय मातीमध्ये जातील, एवढा लाल मातीचा फुफाटा या रस्त्यावर असायचा. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्यांना माती तुडवत व अंगभर माती घेऊनच जावे लागत असे. तुंगार्ली धरणाचे पाणी तुंगार्ली व गोल्ड व्हॅली या भागांना नगर परिषद पिण्यासाठी पाइपलाइनद्वारे देते. ही पाइपलाइन रस्त्याच्या मध्ये येत असल्याने ती रस्त्याच्या कडेला करण्यासदेखील वन विभाग मान्यता देत नसल्याने मागील अनेक वर्षांपासून या भागातील विकास ठप्प झाला होता. नगर परिषदेच्या मनोरंजननगरीचे या भागातील आरक्षणही रस्त्याअभावी धूळ खात पडले होते.
मात्र, याच भागातील एका हॉटेलमध्ये खुद्द मुख्यमंत्री व काही मंत्री चिंतन शिबिरासाठी येणार म्हटल्यावर रात्रीत या भागाचे नशीब उजाडले. लाल मातीच्या फुफाट्याच्या रस्त्याचे तातडीने संपूर्ण डांबरीकरण झाले. एवढेच नाही, तर शहरातील ज्या ज्या रस्त्यांवरून मुख्यमंत्री व मंत्र्यांचा ताफा जाण्याची शक्यता आहे, ते सर्व रस्ते डांबरीकरण व पॅचवर्क करून चकाचक करण्यात आल्याने नागरिक अचंबित झाले आहेत. पांगळोली, ठाकरवाडीत सर्व झोपड्यांचा व रस्त्यांचा परिसर झाडलोट करून स्वच्छ करण्यात आला आहे.(वार्ताहर)

Web Title: Roads change luck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.