शहरातील रस्ते झाले जलमय
By admin | Published: July 11, 2016 12:33 AM2016-07-11T00:33:29+5:302016-07-11T00:33:29+5:30
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या रिमझिम पावसाने दमदार हजेरी लावत रविवारी शहरवासियांना झोडपून काढले़ सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती़ दुपारी दोन
पिंपरी : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या रिमझिम पावसाने दमदार हजेरी लावत रविवारी शहरवासियांना झोडपून काढले़ सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती़ दुपारी दोन वाजल्यानंतर पावसाने चांगला जोर धरला़ त्यामुळे रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी वाहत होते़
पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेले व्यावसायिक, शेतकरी, व्यापारी, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे़ सुट्टीचा दिवस असल्यामुळे लोक बाहेर पडले होते़ परंतु दुपारनंतर अचानक वाढलेल्या पावसाने सर्वांचे हाल झाले़ ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला़ अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाण्याची डबकी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला़ शहरातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौकात सिग्नल न पाळल्यामुळे दुचाकीस्वारांचे किरकोळ अपघात झाले़ भुयारी मार्गांत पाणी साचून राहिल्यामुळे वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागत होती़ पावसाचा जोर वाढत असल्यामुळे अनेकांनी सुट्टी असूनही घरी बसणे पसंत केले़ त्यामुळे रस्त्यांवर तुरळक गर्दी होती़
पावसाचा आनंद लुटण्यासाठी तरुण-तरुणींनी चहाच्या आणि वडा-पावच्या टपऱ्यांवर गर्दी केली होती़ शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरु होती़ शहरातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होती़ काही वेळानंतर ती पुर्ववत झाली़ पिंपरीत एका ठिकाणी घरांवर झाडं पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे़(प्रतिनिधी)