आरएसएसचे शहरात पथसंचलन
By admin | Published: October 12, 2016 01:36 AM2016-10-12T01:36:27+5:302016-10-12T01:36:27+5:30
विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरातील विविध भागांत पथसंचलन करण्यात आले. बदललेल्या गणवेशातील संघाचे हे पहिलेच संचलन
पिंपरी : विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरातील विविध भागांत पथसंचलन करण्यात आले. बदललेल्या गणवेशातील संघाचे हे पहिलेच संचलन असल्याने स्वयंसेवक व नागरिकांमध्ये उत्सुकता होती. शहरात आज पाच ठिकाणी संघाच्या वतीने संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. संचलन मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी स्वयंसेवकांचे उत्स्फू र्त स्वागत केले.
देहू गटाच्या वतीने निगडी परिसरात संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. यमुनानगर येथील ठाकरे मैदानापासून पथसंचलनाला सुरुवात झाली. वाद्यवृंदाच्या तालावर स्वयांसेवकांकडून शिस्तबद्ध पद्धतीने त्रिवेणीनगर, रुपीनगर, मिलिंदनगर, राहुलनगर, आझाद चौक, साईनाथनगर, निगडी गावठाण या परिसरातून पथसंचलन करण्यात आले. साईनाथनगर आणि यमुनानगर परिसरात सचिन चिखले यांच्या वतीने स्वयंसेवकाच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नगरसेविका सुलभा उबाळे, अश्विनी चिखले, शुभांगी बोऱ्हाडे यांनी ध्वजाचे औक्षण केले. राहुलनगर, मिलिंदनगर परिसरात नागरिकांनी स्वयंसेवकांवर फुले उधळत उत्स्फूर्त स्वागत केले. मीनाताई ठाकरे मैदानावर या पथसंचलनाची सांगता करण्यात आली.
या वेळी प्रसिद्ध उद्योजक रामदास माने यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना तरुणांनी उद्योगांमध्ये उतरण्याचे आवाहन केले. स्वच्छ भारत अभियानात संघाचा वाटा उल्लेखनीय असल्याचे माने यांनी सांगितले. या पथसंचलनामध्ये निगडी, चिखली आणि देहूगाव परिसरातून सुमारे ३५० स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.
भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख एकनाथ पवार, अमित गोरखे यांनीही गणवेशात संचलनामध्ये सहभाग घेतला. प्रांत कार्यवाह विनायक थोरात, देहू गटप्रमुख जयंत जाधव यांनीही स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. परिसर महिलाही मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होत्या.
पिंपरी परिसरात चिंचवड गटातर्फे पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी, चिंचवड, काळेवाडी आणि पिंपळे सौदागर या भागातून शेकडो स्वयंसेवकांनी पथसंचलनामध्ये सहभाग नोंदविला. पिंपरी गावातील सत्यम शिवम सोसायटीपासून पथसंचलनास सुरुवात झाली. शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यंदाच्या पथसंचलन आयोजनाचा मान चिंचवड गटास मिळाला. संचलनामध्ये स्वयंसेवकांकडून भारतमातेचा जयघोष केला जात होता. जमतानी कॉर्नरमार्गे अशोक थिएटर, पॉवर हाऊस चौक, गंगावा चौक या मार्गाने संचलन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बदललेला गणवेश आजच्या संचलनाचे प्रमुख आकर्षण होते.
या कार्यक्रमास आर. बी. कृष्णानी यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. संत तुकारामनगर येथे झालेल्या संचलनामध्ये कासारवाडी, सांगवी, पिंपळे गुरव परिसरामधून ३०२ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. राजीव गांधी विद्यालय, नेहरुनगर, संत तुकारामनगर या भागांमधून संचलन झाले. भोसरी गटाद्वारे आयोजित केलेल्या संचलनात इंद्रायणीनगर, मोशी, आळंदी, भोसरी परिसरातून ३११ स्वयंसेवकांनी हजेरी लावली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आकुर्डी गटाच्या संचलनामध्ये वाकड, हिंजवडी, रावेत, आकुर्डी परिसरातून ३६० स्वयंसेवक नवीन गणवेशात उपस्थित होते. गंगाराम पटेल यांनी या वेळी मार्गदर्शन के ले. (प्रतिनिधी)