शहरातील रस्त्यांची होणार पुन्हा चाळण, रिलायन्स जिओ खोदणार १५३ किलोमीटर रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:49 AM2018-02-06T00:49:53+5:302018-02-06T00:49:58+5:30
महापालिकेच्या पथ विभागाच्या वतीने रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीला शहरात ब्रॉडबँड व मोबाईल सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक केबल टाकण्यासाठी तब्बल १५३ किलोमीटर रस्ते खोदाईसाठी नुकतीच परवानगी दिली आहे.
पुणे : महापालिकेच्या पथ विभागाच्या वतीने रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीला शहरात ब्रॉडबँड व मोबाईल सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक केबल टाकण्यासाठी तब्बल १५३ किलोमीटर रस्ते खोदाईसाठी नुकतीच परवानगी दिली आहे. सध्या मार्चअखेरमुळे निधी खर्च करण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणत रस्त्यांची कामे सुरू आहेत. परंतु आता रिलायन्स जिओला रस्तेखोदाईसाठी परवानगी दिल्याने शहरातील रस्त्यांची प्रामुख्याने नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचीदेखील चाळण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या शहरामध्ये विविध विकासकामांच्या नावाखाली वेगगेवळ््या कारणांसाठी रस्तेखोदाई, दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. शहरात कोणत्याही कारणांसाठी रस्तेखोदाई करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक असते. रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने शहरात ब्रॉडबँड व मोबाईल सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक असलेली केबल टाकण्यासाठी महापालिकेकडे पारवनागी मागितली होती. त्यानुसार महापालिकेच्या पथ विभागाने दोन टप्प्यात रिलायन्स जिओला शहरात सुमारे १५३ किलोमीटरचे रस्ते खोदाईसाठी परवनागी दिली आहे. ही परवानगी देताना संबंधित कंपनीकडून रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला १६९ कोटी रुपयांचा निधी महापालिकेकडे जमादेखील केला आहे. यामुळे सध्या रिलायन्स जिओ कंपनीकडून शहरात मोठ्या प्रमाणत रस्तेखोदाई सुरू आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये आपल्या प्रभागासाठी मंजूर झालेला निधी मार्चअखेरपूर्वी खर्च करण्यासाठी शहरामध्ये बहुतेक सर्वच नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये रस्त्यांची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी डांबरी रस्ता खरवडून सिमेंट रस्ते बनविण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. यामुळे गेल्या एक-दीड महिन्यापासून शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी सुरू आहे. यामध्ये महापालिकेच्या दोन विभागांमध्ये ताळमेळ नसल्याने नवीन रस्ता तयार झाल्यानंतर पुन्हा केबल टाकण्यासाठी तो खोदला जातो. त्यात रिलायन्सला कायद्यानुसार परवानगी मिळाल्याने खोदाईचे सर्व नियम धाब्यावर बसवून संबंधित ठेकेदारांकडून रस्तेखोदाई सुरू आहे.
>खोदाईचे काम थांबविण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
रिलायन्स जिओकडून सुरू असलेल्या खोदाईबाबत महापालिकेकडे झालेल्या तक्रारींची दखल पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतली आहे. या कंपनीची चौकशी करून खोदाईचे काम थांबवावे, असा आदेश बापट यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना सोमवारी दिला. ही खोदाई करताना महापालिकेबरोबर झालेल्या कराराचे उल्लंघन होत असल्याचे निवेदन नगरसेवक उमेश गायकवाड यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना नुकतेच दिले आहे. त्याची दखल पालकमंत्री बापट यांनी घेतली आहे. रिलायन्स जिओला खोदाईसाठी मुदतवाढ देताना महापालिकेने आवश्यक ते शुल्क घेतले नाही. महापालिकेचे काही अधिकारी रिलायन्सशी संबंधित आहेत, त्यामुळे त्या कंपनीला अनावश्यक सवलती दिल्या जात आहेत, असेही यामध्ये म्हटले आहे. रिलायन्सकडे महापालिकेची थकबाकी असतानाही त्यांना सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर बापट यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना सोमवारी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, रिलायन्सच्या खोदाईबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याची पडताळणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांचे काम तातडीने थांबवून चौकशी करण्याची गरज दिसून येत आहे. त्याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. दरम्यान, महापालिकेच्या पथ विभागाने याबाबत माहिती संकलित करण्यास प्रारंभ केला आहे, असे समजते.