रस्त्यांची वाढली उंची अन् घरे झाली खुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 01:10 AM2019-03-04T01:10:19+5:302019-03-04T01:10:23+5:30
गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु आहेत.
- सुषमा नहेरकर-शिंदे
पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु आहेत. परंतु ही रस्त्यांची कामे करताना कोणत्याही शास्त्रीय पद्धतीचा वापर न करता सिमेंट रस्त्यांची वाढवलेली भरमसाठ उंची व डांबरी रस्त्यांवरील दरवर्षी वाढत जाणारे थरच्या थर यामुळे शहरातील हजारो सोसायट्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
डांबरी रस्ते करतानादेखील कोणत्याही शास्त्रीय पद्धतीचा उपयोग न करता जुना डांबरी रस्ता खरडून न काढता जुन्या रस्त्यांवर पुन्हा डांबराचे थर दिले जातात. यामुळे गेल्या काही वर्षांत शहरात बहुतेक भागात रस्त्यांची उंची सोसायट्या, घरांपेक्षा अधिक झाली आहे. महापालिकेच्या नियमांनुसार, रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरांचे जोते जमिनीच्या पातळीपासून ४५ सेंटिमीटर उंच असणे गरजेचे आहे. त्यानुसारच नागरिकांना घर बांधण्यासाठी परवानगी दिली जाते; मात्र महापालिकेकडून नागरिकांना हा नियम लागू केला जात असला, तरी महापालिकेकडून मात्र रस्त्यांची कामे करताना याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे. सिमेंट रस्ते करताना जुना डांबरी रस्ता तसाच ठेऊन त्यावर सिमेंटचा भलामोठा थर दिला जातो. तर डांबरी रस्ता करतानादेखील त्याच-त्याच रस्त्यांवर डांबराचे थरच्या थर वाढवले आहेत. यामुळे घर, सोसायट्यांच्या जोत्यापेक्षा रस्त्यांची उंची अधिक वाढल्याने नागरिकांच्या घरात
पाणी शिरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
शहरामध्ये प्रामुख्याने मध्यवस्तीत, प्रभात रस्ता, कोथरूड, सिंहगड रोड, गोखलेनगर, भांडारकर रस्ता, कर्वेनगर, लक्ष्मी रस्ता आदी अनेक भागांमध्ये रस्त्यांची उंची घर, सोसायट्यांपेक्षा अधिक झाली आहे. यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात या सोसायट्या, घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत काही नागरिकांनी महापालिकेकडे लेखी तक्रार दिली आहे.
>तक्रार करूनही दखल नाही
गोखलेनगर येथील आमच्या कपिला सोसायटीमध्ये महापालिकेकडून गेल्या काही वर्षांत नियमितपणे रस्त्यांची कामे करण्यात आले. डांबरी रस्त्यांवर थरच्या थर दिल्याने सोसायटीमधील रस्ते चकाचक झाले खरे. परंतु हे रस्ते करताना कोणत्याही शास्त्रीय पद्धतीचा उपयोग न केल्याने घराची उंची वाढवूनदेखील रस्त्यांची उंची वाढतच राहिल्याने पावसाचे रस्त्यावर येणारे पाणी थेट सोसायटी, घरामध्ये येते. याबाबत प्रशासनाकडे लेखी तक्रार करून देखील अद्याप काही दखल घेतली गेली नाही.
-डॉ. अ. द. गोडबोले, नागरिक (गोखलेनगर)
>कामे करताना दक्षता घेतली जाते
शहरामध्ये कोणत्याही रस्त्यांची कामे करताना काही नियम व अटी ठरल्या आहेत. नव्याने एखाद्या रस्त्याचे काम करताना जुना रस्ता उखडून काढला जातो व त्यानंतर नवीन डांबरी अथवा सिमेंट रस्ता तयार केला जातो. त्यामुळे कोणत्याही रस्त्याचे काम करताना सोसायट्या, त्या परिसरातील घरांमध्ये उंची अधिक होणार नाही, याची दक्षता घेतली जाते. परंतु काही ठिकाणी असे झाले असले तर प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जाईल.
- अनिरुद्ध पावसकर,
पथ विभागप्रमुख, महापालिका