PMC: पुणे शहरातील रस्त्यांवर पहिल्याच पावसात खड्डेच-खड्डे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 04:14 PM2023-07-05T16:14:51+5:302023-07-05T16:16:15+5:30
गेल्या एका महिन्यात शहरात २ हजार २८८ खड्डे बुजविले असल्याचा दावा केला आहे....
पुणे :पुणे शहराच्या विविध भागातील रस्त्यावर खड्डे पडले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खडी पसरली आहे. त्यामुळे वाहन चालविताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. गेल्या एका महिन्यात शहरात २ हजार २८८ खड्डे बुजविले असल्याचा दावा केला आहे.
पुणे शहरात गेल्या आठवड्यात पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यावरील सखल भागात पाणी साचले. त्याने शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. कात्रज आगम मंदिर परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साठून खड्डे तयार झाले असून, त्यामुळे रस्त्यावर डबकी तयार झाली आहेत. पावसाचे पाणी साचत असल्याने मच्छर आणि डासांचा त्रास वाढला असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत असून, लवकरात लवकर महापालिकेने रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. अशात मात्र, मुख्य खाते आणि क्षेत्रिय कार्यालय एकमेकांकडे बोट दाखविण्यात धन्यता मानत आहे.
गेल्या एका महिन्यात शहरात २ हजार ३५८ खड्डे पडले असून, त्यातील २ हजार २८८ खड्डे बुजविले आहेत. आता केवळ शहरात ७० खड्डे शिल्लक असल्याचा दावा पालिकेने केला आहे. पालिकेने गेल्या महिन्याभरात १०८ चेंबरची दुरुस्ती केली आहे, अशी माहिती पालिकेच्या पथ विभागने दिली आहे.