पुणे शहरातील रस्ते तातडीने दुरुस्त करावेत; चंद्रकांत पाटलांचे महापालिका आयुक्तांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 09:12 AM2022-07-21T09:12:54+5:302022-07-21T09:13:06+5:30
शहरातील ९० टक्क्यांहून अधिक खड्डे बुजवल्याचा महापालिकेचा दावा
पुणे : शहरातील ९० टक्क्यांहून अधिक खड्डे बुजवल्याचा दावा महापालिकेने केला आहे. मात्र, शहरातील वास्तव वेगळेच आहे. कोथरूडमधील रस्त्यांचीही मोठी दुरवस्था झाल्याने ते तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी कोथरूडचे आमदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
पाटील यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ते खचल्याचेही दिसून येत आहे.
पावसाने प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक, भेलकेनगर चौक, राहुलनगर, नवीन शिवणे, कर्वे रस्ता, आशिष गार्डन परिसर, गुजरात कॉलनी परिसर, नळस्टॉप चौक (एसएनडीटी चौक-कॅनॉल रोड), पौड फाटा, सदानंद हॉटेलसमोरील बाजू, एनडीए चौक, लोहिया जैन आयटी पार्क, कोथरूड डेपो, मातोश्री वृद्धाश्रमजवळील रस्ता, पौड रोड, आनंदनगरसमोरील बाजू यांसह विविध भागांतील रस्ते मोठ्या प्रमाणात खचले आहेत. याशिवाय काही ठिकाणी सिमेंट रस्त्यालगतचे डांबरी रस्ते खचून असमान झाले आहेत, याकडे पाटील यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.