पथदिवे दिवसा सुरू, रात्री बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:44 AM2017-08-05T03:44:59+5:302017-08-05T03:44:59+5:30
विजेच्या बचतीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत असताना महापालिकेच्या बाणेर, बालेवाडी विद्युत विभाग मात्र याबाबत सुस्त आहे. या विभागाच्या भोंगळ कारभाराचे प्रदर्शन सध्या बाणेर, बालेवाडी भागातील नागरिकांना होत आहे.
बाणेर : विजेच्या बचतीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत असताना महापालिकेच्या बाणेर, बालेवाडी विद्युत विभाग मात्र याबाबत सुस्त आहे. या विभागाच्या भोंगळ कारभाराचे प्रदर्शन सध्या बाणेर, बालेवाडी भागातील नागरिकांना होत आहे. ‘पथदिवे रात्री बंद आणि दिवसा सुरू’ अशी परिस्थिती सध्या बाणेर, बालेवाडी भागात सर्रास सुरू आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाने कारभार सुधारून विजेचा अपव्यय टाळण्याची अपेक्षा बाणेर, बालेवाडी भागातील रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पालिका पथदिव्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. नवीन पथदिवे लावणे. तसेच पथदिव्यांची नियमित देखभाल-दुरुस्ती, हायमास्ट बसविणे यासाठी हा खर्च होतो. अंधार पडण्यास सुरुवात झाली की, रस्त्यावरील दिवे सुरू होणे व पहाटे वेळेवर बंद होणे अपेक्षित असते. मात्र बाणेर, बालेवाडी भागात काही ठिकाणी दिवसभर हे दिवे सुरूच असतात. त्याउलट अनेक ठिकाणी रात्रीही रस्त्यावरील दिवे बंद असतात. पथदिवे सुरू आहेत का? कुठे बिघाड आहेत का? हे विद्युत विभागातील इंजिनिअर तसेच संबंधित कर्मचाºयांनी वेळोवेळी सर्वेक्षण करून पाहणे आवश्यक आहे. मात्र पालिका कर्मचारी बाणेर, बालेवाडी भागात फिरून हे सर्वेक्षण करतात का, असा प्रश्न लोकांना पडला आहे.
वारंवार नागरिकांनी तक्रारी करूनही परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही.
जागरूक नागरिकांनी अनेकदा ही बाब संबंधित कर्मचाºयांच्या निदर्शनास आणून दिली, तरीही याबाबत अद्याप कार्यवाही होत नाही. त्यामुळे भरदिवसा पथदिवे सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळते; परंतु प्रत्यक्षात त्यांच्याच कर्मचाºयांच्या अनास्थेमुळे पथदिवे भरदिवसा सुरू असल्याने विजेचा मोठा अपव्यय परिसरात होत आहे.
आमच्या भागात पथदिवे असून नसल्यासारखे आहेत. त्यामुळे रात्री सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते. शहरात नव्हे, तर एखाद्या खेड्यात राहत असल्याची प्रचिती आम्हाला येत आहे. यासंदर्भात अनेक वेळा मागण्या केल्या; परंतु प्रशासन दखलच घेत नाही, असे अनेक नागरिकांनी सांगितले.