GST अधिकारी असल्याची बतावणी करत व्यापाऱ्याला लुटले; मार्केट यार्डमधील घटना
By नितीश गोवंडे | Published: March 1, 2024 03:11 PM2024-03-01T15:11:59+5:302024-03-01T15:12:50+5:30
याप्रकरणी महेश तोतामल दर्यानी (५२, रा. कोंढवा) या व्यापाऱ्याने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे....
पुणे : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कार्यालयातील अधिकारी असल्याची बतावणी करत व्यापाऱ्याला लुटल्याची घटना मार्केट यार्डमधील भुसार बाजारात घडली. याप्रकरणी महेश तोतामल दर्यानी (५२, रा. कोंढवा) या व्यापाऱ्याने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अनोळखी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्केट यार्डमधील भुसार बाजारात ८ फेब्रुवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास दर्यानी यांच्या व्यापारी पेढीत सहा जण शिरले. जीएसटी कार्यालयातील अधिकारी असल्याची बतावणी त्यांनी केली. पेढीतील व्यवहारांची तपासणी करायची असल्याची बतावणी करून चोरट्यांनी मोबाइलवर चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. यानंतर व्यापाऱ्याला धमकावून गल्ल्यातील २० हजारांची रोकड लुटून चोरटे पसार झाले.
तपासणीच्या नावाखाली व्यापाऱ्याला तोतया जीएसटी अधिकाऱ्यांनी लुटल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मार्केट यार्डातील भुसार बाजारात घबराट उडाली. अखेर गुरूवारी (ता. २९) व्यापाऱ्याने संबंधित घटनेची पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून, सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण पुढील तपास करत आहेत.