Pune | डोक्यात बिअरची बाटली मारून तरुणाला लुटले; कर्वेनगरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 09:06 IST2023-02-01T09:06:08+5:302023-02-01T09:06:14+5:30
फिर्यादी व मित्राला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण...

Pune | डोक्यात बिअरची बाटली मारून तरुणाला लुटले; कर्वेनगरमधील घटना
पुणे : मध्यरात्री घरी जात असलेल्या तरुणाला कर्वेनगरमधील बोळात अडवून डोक्यात बिअरची बाटली घालत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी वारजे पोलिसांनी सौरभ पवार, राहुल चव्हाण आणि कुमार चव्हाण (रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर) या तिघांना अटक केली आहे.
याबाबत तुषार ज्ञानदेव धनवटे (वय २३, रा. इंगळे कॉम्प्लेक्स, उत्तमनगर) यांनी फिर्याद दिली. हा प्रकार कर्वेनगरमधील मावळे आळीत ३० जानेवारी रोजी पहाटे घडला.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र अमित असे दोघे त्यांच्या मावशीच्या घरी जात होते. त्यावेळी बोळात सौरभ पवार याने त्यांना अडविले. खिशातील ९६० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादी यांनी विरोध केल्यावर राहुल चव्हाण याने त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून गंभीर जखमी केले. त्यांनी फिर्यादी व मित्राला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.