बँक व्यवस्थापकाला लुटले
By admin | Published: October 9, 2014 05:18 AM2014-10-09T05:18:10+5:302014-10-09T05:18:10+5:30
गावी निघालेल्या बँक व्यवस्थापकाला मोटारीत कोंबून कात्रजजवळील डोंगरावर नेऊन त्यांच्या पत्नीकडून पाच तोळे सोने आणि ६० हजार ५०० रुपयांची खंडणी उकळण्यात आली
पुणे : गावी निघालेल्या बँक व्यवस्थापकाला मोटारीत कोंबून कात्रजजवळील डोंगरावर नेऊन त्यांच्या पत्नीकडून पाच तोळे सोने आणि ६० हजार ५०० रुपयांची खंडणी उकळण्यात आली. ही घटना रविवारी पहाटे घडली. घाबरलेल्या बँक व्यवस्थापकाने तक्रार देण्याचे टाळले; परंतु नातेवाइकांच्या शब्दांनी धीर आल्यावर त्यांनी पोलिसात फिर्याद दिली. स्वत:ची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केल्यावर या व्यवस्थापकावर अपहरणकर्त्यांनी कोयत्याने वार केले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरूआहेत.
या प्रकरणी आनंदनगर येथे राहणाऱ्या ४२ वर्षीय बँक व्यवस्थापकाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवस्थापक बहिणीला भेटण्यासाठी मिरजला जाणार होते, त्यासाठी रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास ते घरातून बाहेर पडले. घराजवळून रिक्षा पकडून ते स्वारगेटला जाणार होते. सिंहगड रस्त्याच्या दिशेने चालत जात असतानाच पाठीमागून मोटारीतून आलेल्या तिघांनी त्यांना अडवून जबरदस्तीने मोटारीत कोंबले. धारदार हत्यारांचा धाक दाखवत शांत बसण्यास सांगितले. ही मोटार राजाराम पुलानजीक जयदेवनगर येथील एटीएम सेंटरवर नेली. व्यवस्थापकाचे एटीएम कार्ड घेऊन पिन क्रमांक विचारून पैसे काढण्याचा प्रयत्न केला; परंतु पैसे काढण्यात त्यांना यश आले नाही. आरोपींचे लक्ष नसल्याचे पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना पकडून पुन्हा मोटारीत बसविण्यात आले. त्यांच्या हातावर धारदार हत्यारांनी वार करण्यात आले.
ही मोटार पुढे वडगाव बुद्रुकवरून कात्रजच्या नव्या बोगद्याजवळ थांबविण्यात आली. व्यवस्थापकाला खेचत डोंगरावर नेण्यात आले. त्यांच्याच मोबाईलवरून पत्नीला मोबाईल लावण्यात आला. ‘तुमच्या पतीला आम्ही किडनॅप केले आहे. ते सुखरूप हवे असतील तर दोन लाख रुपये आणि पाच तोळे सोने अर्ध्या तासात घेऊन या,’ अशी धमकी दिली. घरात असतील नसतील तेवढी ६० हजार ५०० रुपयांची रोकड आणि अंगावरील दागिने घेऊन व्यवस्थापकाच्या पत्नीने नव्या बोगद्याजवळचा डोंगर गाठला. त्यांच्याकडून हा सर्व ऐवज ताब्यात घेतल्यानंतर जवळच उभ्या असलेल्या एका रिक्षावाल्याला त्यांनी बोलविले. व्यवस्थापकाच्या पत्नीला कात्रज बसथांब्यावर सोडायला सांगितले. त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा व्यवस्थापकाला त्याच ठिकाणी रिक्षातूून सोडण्यात आले.
हातावर वार झाले असल्याने या व्यवस्थापकाने पत्नीला घेऊन रुग्णालय गाठले. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपींकडून पुन्हा आपल्याला धोका होऊ शकतो, या भीतीने त्यांनी पोलिसांना घडल्या प्रकाराची कल्पना दिली नाही. मात्र, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व्यवस्थापकाला नातेवाइक भेटायला येऊ लागल्यावर खरी घटना समोर आली. नातेवाइकांनी आग्रह केल्यावर धीर आल्यानंतर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आला.
ज्या मोटारीतून त्यांचे अपहरण करण्यात आले होते, त्या मोटारीचा एमएच १२, सीडब्ल्यू ७१७१ हा क्रमांक पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी तपास केला. ही मोटार डेक्कन परिसरातून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. खंडणीची रक्कम आणि सोन्याचा ऐवज घेऊन आरोपी ही मोटार तेथेच सोडून पसार झाले, त्यामुळे त्यांचा माग काढण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत.