कंपनी चालकाला लुटले, त्याच पैशावर सुरू केली नवी कंपनी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 09:35 AM2023-11-02T09:35:21+5:302023-11-02T09:35:31+5:30
आठ जणांवर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : कंपनी मालकाचे अपहरण करत त्याच्याकडून पैसे लाटले. तसेच कंपनीचा डेटा व महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरी केली. त्यावरच नवी कंपनी सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ४ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास खराडी- मांजरी रोडवरील जॅकवेल पुलावर घडला. याप्रकरणी आठ जणांवर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष शिवाजी पोवार (३२, रा. सैनिक नगर, मांजरी बुद्रुक) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
हनुमंत विठ्ठल शिरसाट (२९), श्रीकांत यशवंत पवार (३८) व त्यांचे दोन अनोळखी साथीदार, श्रीधर सयाजी साळुंखे (२८), जयश्री अजिंक्य कुरणे (३९) आणि वर्षा रमेश माने (२२) यांच्यावर अपहरण, चोरी आणि फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हनुमंत सिरसाट हा फिर्यादी संतोष पोवार यांच्या कंपनीमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करत होता. मात्र, त्यांच्यामध्ये आर्थिक मतभेद झाल्याने सिरसाट कंपनीतून बाहेर पडला. ४ सप्टेंबर रोजी सिरसाट याने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने संतोष पोवार यांच्या चारचाकीचा पाठलाग केला. खराडी- मांजरी रोडवर पवार यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करत जबरदस्तीने खाली उतरवले. आरोपींनी पोवार यांना गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर पुरंदर येथील निर्जन टेकडीवर नेले. त्याठिकाणी आरोपींनी पोवार यांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांचा मोबाइल व लॅपटॉप घेतला. हनुमंत सिरसाट याने त्याच्या अकाउंटला फिर्यादी यांच्या कंपनीचे अकाउंट ॲड करून घेतले. त्यानंतर पोवार यांच्या बँक खात्यातून जबरदस्तीने पाच लाख रुपये ट्रान्स्फर करून घतले, तसेच चेकद्वारे २४ लाख रुपये उकळले.
आरोपी श्रीधर साळुंके, जयश्री कुरणे आणि वर्षा माने यांनी संतोष पोवार यांच्या कंपनीचा डेटा व अतिशय महत्त्वाची कागदपत्रे चोरली. याच कागदपत्रांच्या आधारावर आरोपींनी नवीन कंपनी सुरू केली. तसेच संतोष पोवार यांच्या कंपनीच्या क्लाईंटसोबत काम सुरू करून फसवणूक केली. या प्रकरणानंतर संतोष पोवार यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असता, न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) मनिषा पाटील करीत आहेत.